Top Newsराजकारण

एकही दहशतवादी मुंबईत आला नाही, राज्यात स्फोटके सापडलेले नाहीत : महाराष्ट्र एटीएस

मुंबई : एकही दहशतवादी मुंबईत आला नाही, त्यांचा कुणी साथीदारही आला नाही, महाराष्ट्रात कोणतेही स्फोटक सापडलेले नाहीत, असं स्पष्टीकरण महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख विनित अग्रवाल यांनी दिले. मुंबईतील धारावीचा रहिवासी असलेला समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख याचे २० वर्ष जुने दाऊद कनेक्शन उघड झाल्याचेही त्यांनी सांगितले. एटीएस प्रमुखांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात माहिती दिली. देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना असल्याचं समोर आलं आहे.

देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना असल्याचं समोर आलं आहे. या कटात पकडला गेलेला एक अतिरेकी हा मुंबईच्या धारावी येथे राहणारा होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कामगिरी केली आहे. दहशतवाद्यांचा मुंबईतील लोकल आणि गर्दीच्या ठिकाणी मोठा घातपात घडवण्याचा कट होता, अशी माहिती समोर येत आहे. पण एवढ्या मोठ्या कटाची माहिती महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला कशी मिळाली नाही? असा सवाल काहीजणांकडून उपस्थित केला जातोय. त्यानंतर आता महाराष्ट्र एटीएसने पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी आपली भूमिका मांडली. महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख विनीत अगरवाल यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

काल तुम्ही दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद बघितली. दिल्ली पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. त्यापैकी एक हा मुंबईच्या धारावीतला आहे. त्याचं नाव जान मोहम्मद अली मोहम्मद शेख असं आहे. त्याचे पाकिस्तानातील डी कंपनीसोबत संबंध असल्याबद्दलचे अनेक रेकॉर्ड आहेत. जवळपास वीस वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड आहे. आमच्या नजरेत तो होताच. पण दहशतवादी कटाबाबतची माहिती आमच्याकडे नव्हती. ती सेंट्रल एजन्सीकडे होती. त्यांच्याकडून ती माहिती दिल्ली पोलिसांना दिली गेली होती, असं अग्रवाल यांनी सांगितलं.

जान शेखने ९ सप्टेंबरला जाण्याचं नियोजित केलं. त्याने १० तारखेला पैसे ट्रान्सफर केले. त्याचं तिकीट कन्फर्म होत नव्हतं. तर त्याने १३ तारखेचं वेटिंग लिस्ट सहामध्ये नाव नोंद करत तिकीट घेतलं. गोल्डन टेम्पल एक्सप्रेस ट्रेनचं त्याने तिकीट घेतलं. त्यानंतर संध्याकाळपर्यंत त्याचं तिकीट कन्फर्म झालं. तो मुंबई सेंट्रलहून एकटा निजामुद्दीमच्या दिशेला रवाना झाला. प्रवासादरम्यान तो कोटा येथे जेव्हा पोहोचला तेव्हा त्याला अटक करण्यात आली. त्याच्याजवळ हत्यारं किंवा स्फोटकं मिळाली नाही. याबाबतची सर्व माहिती दिल्ली पोलिसांकडे आहे. आमची एक टीम आज संध्याकाळी जाणार आहे. दिल्ली पोलिसांकडे असणारी माहिती घेऊन येणार. तसेच आमच्याकडे जी माहिती आहे ती आम्ही दिल्ली पोलिसांना देऊ. त्यानंतर ही केस पुढे कशी जातेय ते बघू, असंही अग्रवाल म्हणाले.

मुंबईमध्ये रेकी केली जाईल, असा अंदाज होता, असं अगरवाल यांनी स्पष्ट केलं. तसेच याप्रकरणी आमच्याकडे जी काही माहिती आहे ती आम्ही दिल्ली पोलिसांना देऊ. अजून आम्हाला एफआयआर मिळालेला नाही. तो आल्यावर कारवाईचं ठरवू, असंही त्यांनी सांगितलं. याशिवाय एकही दहशतवादी किंवा त्यांचा साथीदार मुंबईत आला नाही, असंही ते म्हणाले.

सण-उत्सवांचा कालावधी त्यांच्या निशाण्यावर होता. अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांनी सांगितले, की गर्दी असलेल्या प्रत्येक भागात हल्ला करण्याचे त्यांचे लक्ष्य होते. त्यांनी या संदर्भात अनेक ठिकाणी रेकी केली होती, तर अनेक ठिकाणी त्यांना रेकी करणं बाकी होतं. यामध्ये मुंबईतील वर्दळीची ठिकाणं, लोकल ट्रेन, मोठी मंदिरे, तसेच उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमधील मोठ्या मैदानाचा समावेश असल्याचं बोललं जातं. गणेशोत्सव, नवरात्री, दसरा, रामलीला आणि निवडणूक सभा होणाऱ्या मोठ्या मैदानांचा यात समावेश आहे.

४७ वर्षीय समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख याने गणपती विसर्जनासाठी महत्त्वाचे ठिकाण असलेल्या दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटी, मरिन ड्राईव्ह परिसराची रेकी केली होती. तसेच अनेक वेळा त्याने मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकांची तपासणीही केली होती, अशी माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) सूत्रांनी दिली. तो सायन पश्चिमेकडील एमजी रोडवर असणाऱ्या कालाबखर परिसरात वास्तव्यास होता.

शेखच्या कुटुंबीयांचीही चौकशी

जान मोहम्मदला पत्नी आणि दोन मुली आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांचीही धारावी पोलीस स्टेशनमध्ये नेऊन चौकशी केली. “जान मोहम्मदने काही दिवस ड्रायव्हर म्हणून काम केले, त्यानंतर त्याने कुरिअर बॉय म्हणून काम करण्यास सुरुवात केली. जान सोमवारी संध्याकाळपर्यंत मुंबईत होता. अचानक घरी आला आणि त्याने आपल्याला सांगितलं, की तो काही मित्रांसह उत्तर प्रदेशला जात आहे” अशी माहिती त्याच्या पत्नीने पोलिसांना दिली.

पत्नीला याबाबत संशय आल्यावर त्याने मोबाईलमध्ये तिकीट दाखवले. मात्र पत्नी आणखी काही विचारण्याआधी त्याने घाईघाईने कपडे बॅगेमध्ये भरले आणि संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला, अशी माहिती जान मोहम्मदच्या पत्नीने दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

मित्र परिवाराला धक्का

जान मोहम्मद शेखचे मित्र असलेले फय्याज हुसैन यांनी सांगितले की, मी त्याला लहानपणापासून ओळखतो. त्याला १२ सप्टेंबरला शेवटचं भेटलो होतो. आम्ही एकत्र चहाही प्यायलो, तो ड्रायव्हर म्हणून काम करतो, जेव्हा आम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळाली, तेव्हा आम्हाला धक्का बसला, अशी प्रतिक्रिया हुसैन यांनी दिली.

दिल्ली पोलिसांकडून मित्राचीही चौकशी

फय्याज यांनी सांगितलं की त्यांना दिल्ली पोलिसांकडून फोन आला होता. दिल्ली पोलिसांनी जान मोहम्मदविषयी चौकशी केली आणि फय्याजबद्दलही पूर्ण माहिती घेतली. १३ तारखेला जान मोहम्मदने आपल्याला फोन केला होता, पण दोघेही बोलू शकले नव्हते, असंही फय्याज यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button