राजकारण

अदर पुनावाला ‘डाकू’; भाजपच्या वाचाळवीर आमदाराने दिवे पाजळले!

नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशील्ड’ लसीची किंमत ठरवण्यात आल्यानंतर गोरखपूरच्या भाजप आमदाराने अकलेचे दिवे पाजळले आहेत. अदर पुनावाला हे डाकू आहेत. केंद्र सरकारनं साथीचे रोग कायद्या अंतर्गत सीरम इन्स्टिट्यूट ताब्यात घेण्याची मागणी केलीय. भाजप आमदाराच्या या मागणीनंतर एकच खळबळ उडाली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्ड लशीची नवीन किंमत नुकतीच निश्चित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप आमदाराने हे वक्तव्य केलंय.

सीरमने कोविशील्ड लसीची किंमत ठरवल्यानंतर गोरखपूरचे भाजप आमदार डॉ. राधामोहनदार अग्रवाल यांनी सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांच्यावर हल्ला चढवलाय. यावेळी अग्रवाल यांनी आपल्या अकलेचे तारे तोडत अदर पुनावाला यांचा डाकू असा उल्लेख केलाय. तर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी केंद्र सरकारने ताब्यात घ्यावी अशी मागणीही त्यांनी केलीय. ‘अदर पुनावाला तुम्ही डाकू आहात. पंतप्रधान मोदी, अमित शाह, बी.एल. संतोष, डॉ. हर्षवर्धन यांनी तुमची कंपनी साथ रोग नियंत्रण कायद्या अंतर्गत ताब्यात घेतली पाहिजे’ असं ट्वीट त्यांनी केलंय.

सीरम इन्स्टिट्यूटने राज्य सरकारसाठी 400 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रति डोस दराची घोषणा केली आहे. एसआयआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “येत्या दोन महिन्यांत लस उत्पादनाचा वेग वाढेल. आमच्या एकूण उत्पादन क्षमतेच्या 50 टक्के लस भारत सरकार लसीकरण मोहिमेला आणि उर्वरित 50 टक्के राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना देण्यात येईल.” जगातील इतर कोणत्याही लसींच्या किंमतींपेक्षा आमची लस स्वस्त आहे, असे कंपनीने म्हटले आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या म्हणण्यानुसार अमेरिकेच्या लशीची किंमत प्रति डोस 1500 रुपये आहे, रशियन लसची किंमत 750 रुपये आहे आणि चिनी लशीसाठी प्रति डोस 750 रुपये मोजावे लागत असल्याचं सीरमने म्हटलंय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button