हा काँग्रेसला बुडवणार; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांबद्दल सिद्धूंचे आक्षेपार्ह वक्तव्य

चंदिगढ : पंजाब काँग्रेसमधील कलह अद्यापही कमी झाल्याचे दिसत नाही. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्या संदर्भात अपशब्द वापरताना दिसून आले आहेत. एवढेच नाही, तर सिद्धूंनी स्वत: ला मुख्यमंत्री बनविण्यासंदर्भातही भाष्य केले. संबंधित व्हिडिओमध्ये सिद्धूंनी असेही म्हटले आहे, की २०२२ मध्ये चन्नी काँग्रेसला बुडवतील.
संबंधित व्हिडियोमध्ये परगट सिंग (मैरुन पगडी) म्हणतात, की केवळ २ मिनिटांतच मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी पोहोचत आहेत. यावर सिद्धू म्हणतात, एवढ्या वेळापासून आम्ही त्यांची वाट पाहत आहोत. पुन्हा परगट सिंग म्हणतात, की किती लोक जमले आहेत, आज तर बल्ले-बल्ले आहे. यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांच्या अगदी मागे उभे असलेले पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुखविंदर सिंग डॅनी, म्हणातात की, हा कार्यक्रम सक्सेस आहे. यावर नवजोत सिंग सिद्धू म्हणतात, ‘आणखी कुठे सक्सेस. भगवंत सिंग सिद्धूंच्या (नवजोत सिंग सिद्धू यांचे वडील) मुलाला सीएम केलं असतं, तर दिसला असता सक्सेस.’ यानंतर सिद्धू यांनी आक्षेपार्ह शब्द वापरले आणि म्हणाले, ‘२०२२ मध्ये तर हा काँग्रेसच बुडवेल.’