
पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांच्या नावाची खूप चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. उत्पल पर्रिकर यांच्या समर्थनार्थ शिवसेनेने आपल्या पणजी मतदारसंघातील उमेदवार मागे घेतला आहे. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं उत्पल पर्रिकर यांनी पणजीहून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्पल पर्रिकर यांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास अन्य पक्षांनी त्यांना पाठींबा द्यावा, असं आवाहन केलं होतं. संजय राऊत यांनी पणजीमधून शिवसेनेचा उमेदवार मागे घेण्यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनादेखील टॅग केलंय.
We're keeping our word. @ShivSena is withdrawing it's candidate Shailendra Velingkar frm #Panaji. Not just that,our workers wil fully support #UtpalParrikar.We believe that the battle for Panaji is just abt election, but also abt purification of Goa Politics.@AUThackeray pic.twitter.com/EZZDQognU0
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 31, 2022
आम्ही आमच्या शब्दावर ठाम आहोत. शिवसेनेचे पणजीचे उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. इतकंच नाही, आम्ही उत्पल पर्रीकर यांना पूर्ण समर्थन देऊ. पणजीची लढाई केवळ निवडणुकीपुरतीच नाही, तर गोव्याच्या राजकीय शुद्धीकरणाबाबत असल्याचं आमचं मानणं आहे, असं राऊत यांनी ट्विटमध्ये नमूद केलंय. यासोबत त्यांनी उत्पल पर्रिकरांच्या एका वक्तव्यासोबतचा फोटोही जोडला आहे. तुम्ही दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्या प्रतिनिधित्व केलेल्या निवडणूक क्षेत्रात गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला तिकिट द्याल का?, असं त्यात लिहिलं आहे.




