राजकारण

शिवसेनेच्या माजी आमदाराकडून भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्र्याला बॅनरद्वारे शुभेच्छा

कल्याण : कल्याण शीळफाटा परिसरात लावलेल्या एका बॅनरमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांचे सुपूत्र सुमित भोईर यांनी हा बॅनर लावला आहे. यावर सुभाष भोईर आणि कपिल पाटील यांचा एकत्रित फोटो पाहायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच कपिल पाटील यांच्या नेतृत्वात जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे. आता शिवसेनेकडून कपिल पाटील यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. प्रथमच आगरी समाजातील एखाद्या नेत्याला केंद्रात मंत्रीपद मिळाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. जन आशीर्वाद यात्रेनिमित्त ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे.

शिवसेना नेते सुभाष भोईर यांची २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी डावलण्यात आली होती. त्याऐवजी दुसऱ्या उमेदवाराला तिकीट देण्यात आले होते. त्यामुळे सुभाष भोईर यांचा हा बॅनर शुभेच्छा देणारा आहे की, काही राजकीय संकेत देणारा, हे येत्या काळात उघड होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button