Top Newsराजकारण

रजनीकांत यांच्या पक्षाचे विसर्जन; राजकारणातूनही संन्यास

चेन्नई: दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणातूनच संन्यास घेतला आहे. राजकारणात पुनरागमन करण्याची कोणतीही शक्यता नाही, असं स्पष्ट करतानाच रजनीकांत यांनी ‘रजनी मक्कल मंद्रम’ हा राजकीय पक्ष विसर्जित करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. आरएमएमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर रजनीकांत यांनी हा निर्णय घेतला आहे.

‘रजनी मक्कल मंद्रम’ हा संपूर्ण पक्ष विसर्जित करण्यात येत आहे. यापुढे हा पक्ष कार्यरत राहणार नाही, अस्तित्वात राहणार नसल्याचं रजनीकांत यांनी स्पष्ट केलं. भविष्यात राजकारणात पुनरागमन करण्याची कोणतीही योजना नाही. मी राजकारणात येणार नाही, असं रजनीकांत यांनी स्पष्ट केलं. रजनीकांत यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

रजनीकांत यांनी २९ डिसेंबर २०२० रोजी राजकारणात येणार नसल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांनी राजकारणात येण्याबाबत विचार करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे तामिळनाडूतील राजकारणात हालचाल सुरू झाली होती. त्यानंतर त्यांनी तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका न लढण्याचा निर्णयही घेतला. त्यामुळे रजनीकांत राजकारण सोडणार असल्याचं म्हटलं जात होतं. आता त्यांनी त्यांच्या राजकारणात येण्याबाबतच्या संभ्रमावर पडदा टाकला आहे.

रजनीकांत यांनी गेल्यावर्षी एक चिठ्ठी लिहून त्यांची भूमिका जाहीर केली होती. मी राजकीय पक्ष सुरू करू शकत नाही, याचा मला खेद आहे. अत्यंत जड अंतकरणाने मी हा निर्णय घेत आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. यावेळी त्यांनी कोरोनाचं कारणही पुढे केलं होतं. मी लोकांना भेटलो आणि कोरोना संक्रमित झालो तर माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनाही संसर्ग होईल. त्यांनाही संघर्ष करावा लागेल. जीवनातील शांततेसह त्यांचं मोठं आर्थिक नुकसानाही होईल, असं रजनीकांत म्हणाले होते.

तामिळनाडूतील राजकारणात कोणत्या अभिनेत्याचे किती फॅन्स आहेत हे सुद्धा महत्त्वाचं मानलं जात आहे. हे फॅन्स एकप्रकारे मतदारच असतात आणि राज्यातील राजकारणावर प्रभाव पाडत असतात. तामिळनाडूत कमल हसन यांचे ५,००,००० फॅन्स क्लब आहेत. तर रजनीकांत यांचे केवळ ५०,००० फॅन्स क्लब आहेत. त्यामुळे कमल हसन या फॅन्सच्या जोरावर तामिळनाडूचं राजकारण फिरवू शकतात, असंही बोललं जात आहे. कमल हसन यांच्या फॅन्स क्लबला ‘नरपानी इयेक्कम’ म्हटलं जातं. याचा अर्थ चांगल्या कामासाठी आंदोलन करणारे. हसन यांचे फॅन्स क्लब चांगल्या सामाजिक कामावर भर देत असतात, तर रजनीकांत यांचे फॅन्स क्लब रजनीकांत यांची पूजा करण्यावर भर देतात, हा या दोन्ही फॅन्स क्लबमधला मूलभूत फरक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button