कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडमध्ये भारतीय नागरिकांना ‘नो एन्ट्री’
![](https://dg24.in/wp-content/uploads/2021/04/Heathrow.jpg)
नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा कहर सुरू असून दुसऱ्या लाटेने देशातील नागरिकांच्या चिंतेत अधिक भऱ घातली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा नवा रेकॉर्ड करताना दिसतोय. या पार्श्वभूमीवर इंग्लंडने भारताला अशा देशांच्या रेड लिस्टमध्ये टाकले आहे, त्या अंतर्गत इंग्लंडचे नागरिक नसलेले आणि आयरिश नागरिकांना भारतातून ब्रिटनमध्ये जाण्यास बंदी घातली आहे. तसेच परदेशातून मायदेशी आलेल्या इंग्लंडच्या नागरिकांना १० दिवस क्वारंटाईन राहणं बंधनकारक केलं आहे. यासोबतच अमेरिकेने आपल्या नागरिकांना भारतात प्रवास करू नये, असे आवाहन केले आहे.
गेल्या २४ तासात देशात २ लाख ७३ हजार ८१० कोरोनाच्या नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १ हजार ६१९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर आता अमेरिका, इंग्लंडसह मोठ्या देशांनी भारताच्या दिशेने कठोर पावले उचलली आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता इंग्लंडने भारताला रेड लिस्टमध्ये स्थान दिले आहे. त्यानंतर अमेरिकेनेही आपल्या नागरिकांना भारतात प्रवास न करण्यास सांगितले आहे. जीवघेणा कोरोना विषाणू भारतात दिवसेंदिवस पसरत आहे, ज्यामुळे ते आपल्या नागरिकांना धोकादायक ठरू शकते. अशा धोकादायक परिस्थितीत भारताच्या दिशेने प्रवास करण्यास टाळा, असे आवाहन अमेरिकेकडून करण्यात आले आहे.
इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाने ग्रस्त झाल्याची १०३ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यातील बहुतेक रुग्ण परदेशातून परतणार्या प्रवाशांशी संबंधित आहेत, असे इंग्लंडचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी ‘हाउस ऑफ कॉमन्स’ मध्ये सांगितले. आकडेवारीचे विश्लेषण केल्यानंतर सावधगिरी म्हणून भारताचा रेड लिस्टचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच जर ब्रिटीश किंवा आयरिश लोक गेली दहा वर्षे भारतात राहत असतील तर त्यांना इंग्लंडमध्ये प्रवेश घेता येणार नाही, असे देखील आरोग्य मंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे.तर इंग्लंडने भारतात आढळलेल्या कोरोना विषाणूच्या ‘डबल म्युटंट’ प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि आता लोकांना भारतातून ब्रिटनला जाता येणार नाही. हॅनकॉक म्हणाले की, केवळ ब्रिटिश आणि आयरिश नागरिक भारतातून ब्रिटनमध्ये येऊ शकतील.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव बघता इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द झाला आहे. यापूर्वी ते २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येणार होते. पण त्यावेळेस देखील कोरोनाच्या कारणामुळे हा दौरा रद्द करण्यात आला होता. सलग दोनदा बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द झाल्याचे सांगितले जात आहे.