आरोग्यराजकारण

‘ब्रेक द चेन’चे नवे नियम जाहीर; अत्यावश्यक सेवेतील दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहणार

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी राज्यातील लॉकडाऊन १५ जूनपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा केली. लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आलेला असला तरी काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी होती. परंतु, पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या ठिकाणी ही वेळ आता वाढवण्यात आली असून अत्यावश्यक सेवेतील दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत.

‘ब्रेक द चेन’चे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हिटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनपर्यंत हे निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. २९ मे रोजी असलेली आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता लक्षात घेऊन हे निर्बंध असणार आहेत.

पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे आणि पालिकांसाठी शिथिल करण्यात आलेले निर्बंध –

– अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी
– सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा (केवळ एकल दुकाने, मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील. तसेच शनिवार, रविवार ती बंद राहतील.
– अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई-कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील.
– दुपारी ३ नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील.
– कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही २५ टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल.
– कृषीविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी २ पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते

पॉझिटिव्हिटी दर २० टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी निर्बंध खालीलप्रमाणे वाढवण्यात येतील –

– या जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील आणि कुणाही व्यक्तीला जिल्ह्याच्या आतबाहेर करण्यास परवानगी राहणार नाही. केवळ कुटुंबातील – – – मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल.
– उपरोक्त प्रशासकीय घटकांमध्ये न येणाऱ्या इतर सर्व जिल्हे व पालिकांच्या ठिकाणी १२ मे २०२१ चे ब्रेक द चेनचे निर्बंध नेहमीप्रमाणे लागू राहतील.
– दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही.
– या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल तसेच १२ मे च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल.
– आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button