राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही; गुलाम नबी आझाद यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
श्रीनगर : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील नाराजी, धुसफूस आता चव्हाट्यावर यायला लागली आहे. पंजाबमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री असलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता जम्मू आणि काश्मीरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद पक्षाला सोडचिठ्ठी देऊन नवीन पक्ष स्थापन करणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
नवा पक्ष स्थापन करणार का असा सवाल गुलाम नबी आझाद यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना त्यांनी सध्या आपण नवा पक्ष स्थापन करणार नसल्याचं सांगत भविष्यात काय होईल हे कोणाला माहीत असं उत्तर दिलं. एका वृत्तसंस्थेशी विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. तसंच यावेळी त्यांनी काँग्रेस नेतृत्व टीका ऐकण्यासाठी तयार नसल्याचं म्हटलं. याशिवाय त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचीही आठवण काढली.
आपण जेव्हा दोन महासचिवांना युथ काँग्रेसमध्ये नियुक्त करण्यास नकार दिला तेव्हा इंदिरा गांधी यांनी किप इट अप असं म्हटलं. परंतु आज कोणालाही काही ऐकायचं नाही. जम्मू काश्मीरमधील काँग्रेस प्रमुखांना हटवण्याची जी मागणी होत आहे, त्या मोहिमेचा आपण भाग नाही. जम्मू काश्मीरमध्ये जनजीवन पुन्हा सुरळीत करण्यासाठी रैलींचं आयोजन केलं जात आहे. कलम ३७० हटवल्यानंतर आणि राज्याच्या दर्जा काढून घेतल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये राजकीय कार्यक्रम ठप्प झाले आहेत, असंही त्यांनी नमूद केलं.
नेतृत्व आणि लोकांमधील संपर्कात दरी
सध्या आपण कोणताही नवा पक्ष स्थापन करणार नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये नेतृत्व आणि लोकांमधील संपर्क तुटला होता. ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० हटवण्यात आलं. त्यानंतर राजकीय कार्यक्रम ठप्प झाले. हजारो लोकांना तुरुंगात पाठवण्यात आलं. तुरुंगाबाहेरही जे लोक होते, त्यांना राजकीय कार्यक्रमांची परवानगी देण्यात आली नव्हती, असं आझाद म्हणाले.
मला एक राजकीय मार्ग दिसला आणि काम सुरू केलं. अन्य पक्षही तेच करत असल्याचं आझाद म्हणाले. यावेळी त्यांना काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफुस आहे आणि अनेक नेते राजीनामा देत आहेत, असा सवाल करण्यात आला. यावर उत्तर देताना आपल्यासाठी प्रत्येक व्यक्ती काँग्रेसी आहे. जेव्हा मी जम्मू काश्मीरमध्ये रागतो तेव्हा आपण केवळ काँग्रेस पक्ष किंवा कोणत्या एका विशिष्ट लोकांबद्दल बोलत नसल्याचे आझाद म्हणाले.
यावेळी ते जम्मू काश्मीर काँग्रेस अध्यक्षांसह कोणत्या बैठकीत सामील झाले नाहीत हा केवळ योगायोग आहे का असा सवाल करण्यात आला. काही लोकांना काम करण्याची सवय असते. मला अधिक काम करण्याची सवय आहे. मी कासवगतीनं चालू शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावर दिली.