Top Newsराजकारण

उत्तर प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेसची समाजवादी पक्षासोबत आघाडी

लखनऊ : उत्तर प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाशी हातमिळवणी करून निवडणूक लढवेल. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांनी ज्या समविचारी पक्षांची मोट बांधली आहे त्या आघाडीला राष्ट्रवादीचा पूर्ण पाठिंबा आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशात भाजपविरोधी जी लाट दिसत आहेत त्या लाटेला राष्ट्रवादी पक्ष अधिक गती देईल, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं. मुंबईत आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी योगी सरकारच्या मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत आणि इतर मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केलं.

पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथ पाहायला मिळते आहे. योगी सरकारच्या दोन-तीन मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. तसंच, अंदाजे १२-१३ आमदारांनी भाजपला निवडणुकीच्या तोंडावर सोडचिठ्ठी दिली आहे. येत्या दिवसांमध्ये उत्तर प्रदेशात मोठे उलटफेर पाहायला मिळतील असं सांगितलं जातंय. काही नेते भाजपचं उत्तर प्रदेशातील अस्तित्व संपुष्टात आणण्याबद्दलही बोलत आहेत. यावरून हे स्पष्ट होतं की गेल्या पाच वर्षात केवळ अहंकाराच्या जोरावर सरकार चालवण्यात आलं, असा घणाघाती आरोप नवाब मलिक यांनी मुंबईत बोलताना केला.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विशिष्ट समुदायाला हाताशी घेऊन इतर जनतेला त्रास दिला. काही आमदारांवर बलात्कारासारखे गुन्हे दाखल आहेत. ब्राह्मण समाजातील लोकांची घरं जाळण्यात आली. शेतकऱ्यांवर गाड्या चालवून त्यांच्या हत्या करण्यात आल्या. या साऱ्या घटनांमुळे उत्तर प्रदेशातील जनता नाराज आहे. भाजपा यंदाच्या निवडणुकीत पराभूत होणार हे दिसू लागल्याने आमदार मोठ्या प्रमाणावर राजीनामे देत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांत या प्रकारची उलथापालथ दिसून आली आहे, असंही नवाब मलिक म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button