Top Newsराजकारण

शिवसेना, काँग्रेसच्या मंत्र्यांवर राष्ट्रवादीचे नेते नाराज; शरद पवारांसमोर कैफियत

मुंबई : महाविकास आघाडीचं सरकार स्थिर असून ते ५ वर्षांचा कालावधी पूर्ण करेल असा दावा तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून वारंवार केला जात आहे. मात्र तिन्ही पक्षातील समन्वयाचा अभाव अनेकदा दिसून आला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आपल्याला विचारात घेत नसल्याची तक्रार याआधी काँग्रेसनं केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीनं शिवसेना आणि काँग्रेसबद्दल नाराजी बोलून दाखवली आहे. राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांची बैठक आज संपन्न झाली. त्यावेळी अनेक नेत्यांनी शिवसेना, काँग्रेसच्या पालकमंत्र्यांबद्दल नाराजी व्यक्त केली.

शिवसेना आणि काँग्रेसचे पालकमंत्री राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची कामं करत नाहीत, अशी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची तक्रार आहे. राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेच्या पालकमंत्र्यांवर विशेष नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी पक्षाच्या बैठकीत बोलून दाखवली. तीन पक्षांचं सरकार असल्यानं सहकार्य अपेक्षित आहेत. मात्र शिवसेना, काँग्रेसचे पालकमंत्री राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची कामं मार्गी लावत नाहीत, अशा शब्दांत आजी-माजी आमदारांनी नाराजी व्यक्त केली.

राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘प्रत्येक पक्ष आपल्या आमदाराला झुकतं माप देत असतो. मात्र सत्तेत असलेल्या इतर पक्षांना सहकार्य करणं अपेक्षित आहे. प्रत्येक प्रश्न सुटेलच असं नाही. मात्र प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत,’ असं मलिक म्हणाले.

सरसकट युती किंवा आघाडी नाही : नवाब मलिक

काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिलेला असतानाच आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही मोठं विधान केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सरसकट युती किंवा आघाडी करणार नाही, असं मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीही स्वबळाच्या मूडमध्ये असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कुणाशाही सरसकट आघाडी किंवा युती केली जाणार नाही. स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असं मलिक यांनी स्पष्ट केलं. ओबीसी आरक्षणाबाबतचा डेटा वेळेत मिळाला नाही आणि निवडणुका लागल्या तरी आम्ही ओबीसींना पूर्ण न्याय देऊ. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्या ठिकाणी ओबीसींसाठी जागा आरक्षित होत्या त्या ठिकाणी ओबीसीच उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली.

भाजपने श्रेय घेऊ नये

गणपती विसर्जन झाल्यावर जनता दरबार पुन्हा सुरू होणार आहे, असं त्यांनी सांगितलं. चिपी विमानतळाला आघाडी सरकारच्या काळात मंजुरी मिळाली आहे. तेव्हा भाजप विरोधात होता. त्याचं काम आमच्या काळातलं आहे. भाजपनं उगाच‌ याचं श्रेय घेऊ नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button