लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आर.पी.एन. सिंह यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपत प्रवेश केला आहे. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवत आर.पी.एन. सिंह यांनी भाजपत प्रवेश केल्यामुळे निवडणुकीत पक्षाला मोठी ताकद मिळाली आहे. यूपीए सरकारच्या काळात मंत्री राहिलेले आर.पी.एन. सिंह यांच्या पक्ष प्रवेशामुळे उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे.
सत्ता कायम राखण्यासाठी भाजप लढत असताना स्वामी प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्यामुळे पक्षाला ओबीसी चेहऱ्याची कमतरता भासत होती. आर.पी.एन. सिंह सिंह यांच्या येण्यानं भाजपाची ही पोकळी भरुन निघणार आहे. आर.पी.एन. सिंह यांच्या भाजप प्रवेशामुळे पूर्वांचल आणि विशेष म्हणजे कुशीनगरमधील राजकीय गणित बदलणार आहेत. पूर्वांचलमध्ये स्वामी प्रसाद मौर्य यांच्यारुपाने भाजपनं ओबीसी चेहरा गमावला. परंतु आर.पी.एन. सिंह यांच्यामुळे भाजपची ती कमी भरुन निघणार आहे. कारण आर.पी.एन. सिंह ओबीसी समुदायातून येतात. त्याशिवाय कुशीनगरमध्ये त्यांच्या राजघराण्याचा दबदबा आहे. त्यामुळे कुशीनगर जिल्ह्यात राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.
आर.पी.एन. सिंह हे मागासवर्गीय सैंथवार कुर्मी जातीतून येतात. पूर्वांचल परिसरात या जातीच्या लोकांची संख्या जास्त आहे. इतकच नाही तर आर.पी.एन. सिंह हे काँग्रेससाठी पूर्वांचलमधील सर्वात मोठा चेहरा होता. अशावेळी त्यांच्या भाजप प्रवेशाने पक्षाला पूर्वांचलमध्ये मोठी ताकद मिळेल. त्याचप्रमाणे स्वामी प्रसाद मौर्य यांच्या जाण्यानं पक्षात ओबीसी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली तीदेखील भरता येईल. आर.पी.एन. सिंह यांचे पडरौना विधानसभा मतदारसंघावरही वर्चस्व आहे. १९९६ मध्ये ते पहिल्यांदा या जागेवरुन आमदार म्हणून निवडून आले. २००९ पर्यंत ते आमदार होते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी स्वामी प्रसाद मौर्य यांना मात दिली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत स्वामी प्रसाद मौर्य जिंकून आले. परंतु २०१४, २०१९ मध्ये भाजपकडून आर.पी.एन. सिंह यांना पराभव सहन करावा लागला होता.
काँग्रेस पक्ष पूर्वीसारखा राहिलेला नाही; आर.पी.एन. सिंह
काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचं नक्की कारण काय? असा प्रश्न त्यांनी भाजप प्रवेशानंतर पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, मी गेली ३२ वर्षे एकाच पक्षात म्हणजेच काँग्रेसमध्ये कार्यरत आहे. पण सध्याची काँग्रेस आणि माझ्या वेळची काँग्रेस यात फरक आहे. आताचा काँग्रेस पक्ष पूर्वीसारखा राहिलेला नाही. त्यामुळे काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपामध्ये मी सामान्य कार्यकर्त्यासारखाच असेन. पंतप्रधान मोदी यांचे भारताच्या विकासाचं स्वप्न पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल.
आरपीएन सिंह हे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाच्या तिकिटावर पडरौना येथून स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात निवडणूक लढवू शकतात. याच मुद्द्यावर पत्रकारांनी सवाल केला की तुम्ही आणि तुमची पत्नी दोघेही यंदाची उत्तर प्रदेशची निवडणूक लढवणार आहात अशी चर्चा आहे, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? त्यावर सिंह म्हणाले की सध्या तरी मी एवढं नक्कीच सांगेन की मी एकटाच राजकारणात आहे. मला माझा पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मी पार पाडेन.