
कोहिमा : भारताच्या ईशान्येकडील नागालँड राज्याच्या मोन जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी सुरक्षा दलांनी केलेल्या कथित गोळीबारात किमान ११ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यानंतर या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. ही घटना मोन जिल्ह्यातील ओटिंग गावात घडली. गाडीमध्ये दहशतवादी असल्याच्या संशयावरून सुरक्षा दलांच्या जवानांनी कथितरित्या त्यांच्यावर गोळीबार केला आणि त्यात ११ जणांचा मृत्यू झाला.
नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रियो यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसंच या घटनेची निंदा करत त्यांनी लोकांता शांतता राखण्याचं आवाहन केलं. याशिवाय या प्रकरणाचा तपास एसआयटी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील या घटनेवर दु:ख व्यक्त केलं. नागालँडमध्ये घडलेल्या घटनेचं दु:ख आहे. ज्या लोकांचा यात मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. राज्य सरकारद्वारे स्थापन करण्यात आलेली उच्चस्तरीय एसआयटी या घटनेचा तपास करणार आहे, अशी प्रतिक्रिया अमित शाह यांनी ट्विटरद्वारे दिली.
मोन ओटिंगच्या नागरिकांची हत्या ही अतिशय दुर्देवी आणि नींदनीय घटना आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूती आहे. यात जखमी झालेल्यांची प्रकृती लवकर चांगली होईल अशी प्रार्थना करतो. उच्चस्तरीय एसआयटी या प्रकरणाचा तपास करेल आणि कायद्यानुसार न्याय दिला जाईल. सर्वांनी शांतता राखण्याचं मी आवाहन करत आहे, असं नागालँडच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे सांगितलं.




