कोरोनाचा हाहा:कार!; राज्यात दिवसभरात ६७,१२३ नवे रुग्ण, मृतांचा आकडाही ४०० पार

मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सध्या महाराष्ट्रात रोज ६० हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत आहेत. शनिवारची आकडेवारी तर चिंतेत अधिकच भर पाडणारी आहे. दिवसभरात महाराष्ट्रात तब्बल ६७,१२३ नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. हा आकडा गुरुवारच्या (१५ एप्रिल) तुलनेत ५ हजार ४२८ रुग्णांनी जास्त आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना आलेख वर जात असून रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. राज्यात मृतांची संख्यासुद्धा रोज वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात ४१९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
राज्यात आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३७ लाख ७० हजार ७०७ झाली असून राज्यात सध्या ६ लाख ४७ हजार ९६६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३५,८०,९१३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३७,७०,७०७ (१५.९९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,७२,५८४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये असून २५,६२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
शनिवारी राज्यात ४१९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५९ टक्के इतका आहे. आतापर्यंत एकूण ५७ हजार ९७० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच मागील २४ तासांत ५६ हजार ७८३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण ३० लाख ६१ हजार १७४ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८१.१८ टक्के इतके आहे.
मुंबईत २४ तासात ८,८३४ नवे रुग्ण
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील कोरोनापरिस्थिती चिंताजनक झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. मुंबईतील रुग्णालय, कोविड सेंटर तसेच खासगी रुग्णालयातील बेड रुग्णांनी भरले आहेत. गेल्या २४ तासात मुंबईत ८ हजार ८३४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ७० हजार ८३२ झाली आहे. यामधील ८७ हजार ३६९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर एकाच दिवसात ५२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाणे मृतांचा आकडाही वाढतो आहे.
मुंबईत गेल्या २४ तासात ५२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे १२ हजार २९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांची संख्या जरी वाढत असली तरी मुंबईत कोरोनावर ६ हजार ६१७ रुग्णांनी मात केली आहे. आतापर्यंत एकूण ४ लाख ६९ हजार ९६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यानुसार मुंबईत कोरोना रुग्णांचा बरे होण्याचा दर हा ८२ टक्के आहे. मुंबईत एकूण ४७ हजार २५३ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत एकूण ४ कोटी ८ लाख ९९ हजार ५ कोरोना चाचण्या करण्यात दिल्या आहेत.




