अर्थव्यवस्था मोजण्यात आरबीआयचे गव्हर्नर अपयशी ठरले, तर संपूर्ण देश कोलमडेल : मलिक
मुंबई: देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून राष्ट्रवादी काँग्रेसने मोठं विधान केलं आहे. रिझर्व्ह बॅंकचे गव्हर्नर किंवा त्यांची संपूर्ण व्यवस्था देशाची अर्थव्यवस्था मोजण्यात अपयशी होत असेल तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल, अशी भीती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.
नवाब मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देशाचा जीडीपी उणे ७.५ टक्के गेला ही सत्य परिस्थिती आहे. याचा अर्थ रिझर्व्ह बॅंकेकडून आकलन चुकीचे होत आहे. सरकार पैसे मागतेय तर तुम्ही देताय. रिझर्व्ह बॅंकेला हे कळलं पाहिजे. तुम्ही अंदाज घेत नाही मग देशाची अर्थव्यवस्था कशी चालणार आहे? असा सवालही मलिक यांनी केला. रिझर्व्ह बॅंकेने कबूल केले आहे हे चांगलं आहे परंतु आकलन चुकत असेल तर हे देशासाठी सारखं सारखं चांगलं राहणार नाही, असंही ते म्हणाले.
यावेळी मलिक यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. केंद्र सरकारने निव्वळ हेडलाईन मॅनेजमेंट करण्याऐवजी देशाचा एक चार्ट बनवून देशातील जनतेसमोर ठेवावा, अशी मागणीही त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठका घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे. परंतु बैठका घेऊन फक्त या महिन्यात १२ कोटी, डिसेंबरपर्यंत २१० कोटी लसी उपलब्ध होईल असे सांगणे किती योग्य आहे, असा सवाल त्यांनी केला.
राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार याची माहिती दिली पाहिजे. केंद्र किती खरेदी करणार, राज्यांना किती मिळणार आणि खासगी लोकांना खरेदी करून त्यांनी त्याचा वापर किती करावा याबाबतची स्पष्टता केंद्रसरकारने आजपर्यंत जाहीर केलेली नाही, असेही त्यांनी सांगितले. कधी प्रकाश जावडेकर वेगळं बोलतात तर कधी जे. पी. नड्डा वेगळी घोषणा करतात. फक्त वेगवेगळ्या हेडलाईन होण्यासाठी हे लोक बोलत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सत्यता देशासमोर ठेवा
१२ कोटी लस पुरवठा जूनपर्यंत होणार होता मात्र आजपर्यंत किती पुरवठा झाला असा सवाल करतानाच कालपर्यंत लसीकरण केंद्रे बंद होती. जी सत्यता आहे ती स्वीकारली पाहिजे आणि त्यानुसार कार्यक्रम बनवून देशासमोर ठेवावा अशी मागणीही त्यांनी केली.