मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी अनेक नेतेमंडळींच्या ममता दीदींनी भेटीगाठी घेतल्या. मात्र, यानंतर आता महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. ममता बॅनर्जी यांनी केलेल्या टीकेवर काँग्रेस नेते एकीकडे उत्तरे देत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी काँग्रेसला एक सल्ला दिला आहे. यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर देताना, नवाब मलिकांची तेवढी पात्रताच नाही, अशा शब्दांत मलिकांना सुनावले आहे.
देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढण्याची आवश्यकता आहे. परदेशात राहून राजकारण करता येत नाही. रस्त्यावर उतरला नाही, तर भाजप तुम्हाला क्लीन बोल्ड करेल, असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला होता. याला प्रत्युत्तर देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, भाजप आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात काँग्रेसच लढत आहे हे देशाला माहित आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी व वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी सोयीप्रमाणे भूमिका घेऊन कोणत्याही पक्षाला भाजपविरोधात लढता येणार नाही. काँग्रेस हाच देशासाठी आणि लोकशाहीसाठी सक्षम पर्याय आहे.
बाळासाहेब थोरात यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वास्तव स्विकारण्यासंबंधी दिलेल्या सल्ल्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर, काँग्रेसला सल्ला द्यावा एवढी नवाब मलिकांची पात्रता नाही. काँग्रेस हा फक्त पक्ष नाही तर विचार आहे. अशा वक्तव्यांनी आम्ही अस्वस्थ होणार नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. ममता बॅनर्जी युपीएच्या सदस्यही नाहीत. आतापर्यंत भाजपला जो विरोध केला आहे तो काँग्रेसने, युपीएने, राहुल गांधी यांनी केला आहे. त्यामुळे या बोलण्याला काही अर्थ नाही. शेवटी नेतृत्व काँग्रेसलाच करावे लागणार आहे. देशात काँग्रेस पक्ष असून तो भाजपला विरोध करणारा आहे. पर्याय म्हणून काँग्रेस असून सर्वांचे सहकार्य घ्यावे लागेल हे खरे आहे. युपीए सर्वांचे सहकार्य घेतच असते, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सात वर्षात काँग्रेस पक्षाने भाजप सरकारविरोधात निडरपणे लढा लढला आहे. राहुल गांधी आणि संपूर्ण कुटुंबियांवर या दरम्यान भाजप आणि इतर पक्षांकडून वैयक्तीक हल्ले केले गेले. त्यांच्या बदनामीच्या मोहिमा चालवल्या गेल्या, मात्र तरीही राहुलजी गांधी मागे हटले नाहीत. देशातील गोरगरिब सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून मोदी सरकारच्या विरोधात पहाडाप्रमाणे ठामपणे उभे राहून लढत राहिले. त्यामुळेच आज देशातील जनतेने त्यांची भूमिका स्वीकारलेली आहे. अशा वेळी राहुल गांधीवर अप्रत्यक्षपणे टीका करून भाजपला मदत होईल अशी भूमिका घेणारे पक्ष भाजपला पर्याय कसा ठरू शकतात, अशी विचारणा बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.