
लखनौ : पुढीलवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागलं आहे. त्यादरम्यान, राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने बसप आणि भाजपला जोरदार धक्का दिला आहे. बसपच्या सहा आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. तर भाजपच्या एका आमदाराने समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. या सर्व आमदारांनी अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. यावेळी अखिलेश यादव यांनी सांगितले की, भाजपविरोधात जनआक्रोश एवढा आहे की, या निवडणुकीत भाजप भुईसपाट होईल.
अखिलेश यादव यांनी सांगितले की, खूप असे लोक आहेत, जे समाजवादी पक्षात येऊ इच्छित आहेत. येणाऱ्या काळात याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. अखिलेश यांनी सांगितले की, भाजपाने जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, असं आश्वासन भाजपानं दिलं होतं मात्र उत्पन्न कधी दुप्पट होईल, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. आवश्यक सामान आज खूप महाग झाले आहे.
आज बसपमधून सपामध्ये प्रवेश केलेल्या आमदारांमध्ये अस्लम राइनी, अस्लम अली चौधरी, मुज्तबा चौधरी, हाकिम लाल बिंद, हरगोविंद भार्गव, सुष्मा पटेल हे सहा आमदार बसपचा हत्ती सोडून समाजवादी पक्षाच्या सायकलवर स्वार झाले आहेत. तर भाजपचे सीतापूरमधील आमदार राकेश राठोड हे समाजवादी पक्षात दाखल झाले आहेत.




