Top Newsराजकारण

शेतकरी कधीही थकणार नाही; राष्ट्रवादी काँग्रेसचा केंद्र सरकारवर इशारा

मुंबई : केंद्र सरकारला वाटत असेल शेतकरी थकणार आहे तर ही त्यांची भूल आहे… शेतकरी कधीही थकणार नाही… त्यामुळे वेळ गेलेली नाही. चर्चा करा… कायदे रद्द करा… असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे. देशात तीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा सुरुवातीपासून आहे. परंतु भारत बंदला आवाहन केले आहे, मात्र याबाबत पक्षाचा अजून निर्णय झालेला नाही. याबाबत पक्षातंर्गत चर्चा करुन त्यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय होईल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याबाबतची भूमिका शेतकऱ्यांची आहे त्याला सुरुवातीपासून पाठिंबा राहिलेला आहे. तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत ही भूमिका पक्षाची आहे. नवीन कायदा करण्याचा अधिकार सरकारला असतो. लोकांना विश्वासात घेऊन कायदा केला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली होती. कायदा बदलून नवीन कायदा करता आला असता, पण आम्ही एक पाऊल मागे घेणार नाही ही मोदी सरकारची भूमिका राहिली आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलन लांबले आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

मलिकांचा राज ठाकरेंना टोला

कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यावर राज्यातील मुदत संपलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुका होतील. परंतु ज्यांना राज्यसरकार हे जाणूनबुजून करतंय असं ज्यांना वाटतंय त्यांनी विविध हायकोर्टाचे आदेश आलेत त्याचा अभ्यास करावा, असा टोलाही नवाब मलिक यांनी नाव न घेता राज ठाकरे यांना लगावला आहे. राज्यात काही महानगरपालिकांच्या मुदत संपल्यावर कोरोनामुळे निवडणूका घेता आल्या नाहीत तिथे प्रशासक नेमण्यात आले आहेत. कोरोना असताना नेमणूकांबाबत हे सरकार जाणूनबुजून कुठेही प्रशासक नेमण्याच्या मनस्थितीत नाही असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

निवडणूक आयोगाला जबाबदार धरलं पाहिजे

जेव्हा पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या निवडणूका झाल्या त्यावेळी कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर विविध न्यायालयाने राजकीय पक्षांवर बोट ठेवण्याचे काम केले. मुळात याप्रकरणी निवडणूक आयोगाला जबाबदार धरले पाहिजे होते असेही नवाब मलिक म्हणाले. सरकारला प्रशासकाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था चालल्या पाहिजे यामध्ये रस नाही. लोकशाहीत निवडून आलेल्या लोकांनी कामकाज केले पाहिजे, परंतु कोरोनामुळे ही परिस्थिती आल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीच्या आजी – माजी आमदारांची बैठक बुधवारी

राष्ट्रवादीच्या चिन्हावर २०१९ मध्ये निवडणूक लढून विजयी झालेले व पराभूत झालेल्या उमेदवारांची महत्वपूर्ण बैठक बुधवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. ही बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित होती. मात्र पवार यांच्या तब्येतीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता ही बैठक पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे. या बैठकीत विजयी व पराभूत झालेल्या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे, असंही मलिक यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button