राजकारण

प्रश्न विचारणाऱ्या किती लोकांना अटक कराल?; नवाब मलिकांचा मोदी सरकारला संतप्त सवाल

मुंबई: कोरोना लसीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. परदेशात हक्काची लस पाठवली तर लोक प्रश्न विचारणारच. किती लोकांना भाजप सरकार अटक करणार आहे? असा सवाल करतानाच लोकांचा आवाज दाबण्याची ही केंद्रसरकारची कायरता आहे, अशा शब्दात नवाब मलिक यांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला आहे. संपूर्ण देश एकजूट आहे. किती लोकांना अटक करताय बघुया, असे आव्हानही त्यांनी यावेळी भाजपला दिले.

पत्रकारांशी संवाद साधताना नवाब मलिक यांनी हा हल्ला चढवला. दाओसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही लसगुरु बनल्याचे जाहीर केले होते. यूएनमधील भारतीय दुतावासाने सांगितले की, जितके लसीकरण भारतात झाले नाही त्यापेक्षा जास्त लस विदेशात पाठवण्यात आली आहे. आता केंद्र सरकार मात्र एक कोटी पाठविल्याचे सांगत आहे. तर काहीजण पाच कोटी कंपल्सरी पाठवायच्या होत्या म्हणून पाठवल्याचे बोलत आहेत. जेव्हा देशात लस उपलब्ध होत नाहीय तेव्हाच प्रश्न उपस्थित केले जात असल्याचे मलिक म्हणाले.

मोदीजी, आमच्या मुलांच्या हक्काची लस विदेशात का पाठवली? अशी पोस्टर्स काही लोकांनी लावली आहेत. तर भाजपचे काही लोक लहान मुलांची लस तयारच झाली नसल्याचे बोलत आहेत. सारे भारतीय भारतमातेची लेकरं आहेत. लस विदेशात पाठवली तर प्रश्न लोकं विचारणारच ना? परंतु केंद्रसरकार प्रश्न विचारणाऱ्या लोकांना गुन्हा दाखल करtन अटक करत आहे. संपूर्ण देश प्रश्न विचारतोय… किती लोकांना अटक करणार मोदीजी?, असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.

वादळाचा धोका टळला नाही, सावध राहा

तौक्ते वादळाने निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेले तीन दिवस प्रशासकीय अधिकार्‍यांशी चर्चा करून आढावा घेत आहेत. शिवाय या वादळाने कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी सर्व पध्दतीने सरकारच्यावतीने तयारी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून सगळी माहिती घेत आहेत. कोकणातील काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. त्याचबरोबर मुंबईतही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बीकेसीतील कोविड सेंटर जे तात्पुरते उभारण्यात आले होते. त्यातील १९३ रुग्णांना मनपाच्या विविध हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. जे रुग्ण आयसीयूमध्ये होते त्यांनाही व्यवस्थित हलविण्यात आले आहे. जीवितहानी होणार नाही यादृष्टीने ही दक्षता घेण्यात आली आहे. अजून धोका टळलेला नाही लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button