महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुष्मिता देव यांचा राजीनामा
नवी दिल्ली : महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि माजी खासदार सुष्मिता देव यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केला असून आपला राजीनामा सोनिया गांधी यांच्याकडे सोपवला आहे. त्या आता तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. सुष्मिता देव या काँग्रेस पक्षाच्या महत्वाच्या आणि राहुल गांधींच्या जवळच्या नेत्या मानल्या जात होत्या. त्यांच्या राजीनाम्याने काँग्रेसला एक मोठा झटका बसल्याचं सांगण्यात येतंय.
तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मूळच्या आसामच्या असणाऱ्या सुष्मिता देव यांच्याकडे त्रिपुराच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्रिपुरामध्ये बंगाली भाषिक लोकांची संख्या मोठी असल्याने पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आपली सर्व शक्ती पणाला लावणार असल्याचं समजतंय. त्यांनी आपल्याला विविध पदांवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल सोनिया गांधी यांचे आभार मानले आहेत. सुष्मिता देव यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, मी आशा करतेय की जनसेवेचा नवा अध्याय सुरु करताना आपल्या शुभेच्छा नेहमी माझ्यासोबत असतील.
सुष्मिता देव यांचे वडील कै. संतोष मोहन देव हे पाच वेळा आसाममधील सिलचर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं होतं तर दोन वेळा त्यांनी पश्चिम त्रिपुरा या लोकसभेच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. नंतरच्या काळात २००४ साली सिलचर या मतदार संघाचे प्रतिनिधित्व हे सुष्मिता देव यांनी केलं. आसाम विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून त्या पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. असं सांगितलं जातंय की, काँग्रेसने सीएए वर घेतलेल्या मुद्द्यावरून त्यांची द्विधा मनस्थिती झाली होती. कारण सुष्मिता देव ज्या बराक व्हॅली मधून येतात त्या ठिकाणच्या बंगाली हिंदू नागरिकांचा केंद्र सरकारच्या या कायद्याला पाठिंबा होता.