सुबोधकुमार जयस्वाल यांच्या विरोधात पंतप्रधान मोदींकडे तक्रार

मुंबई : राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलातील निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र त्रिवेदी यांनी ही तक्रार केली आहे. जयस्वाल हे केंद्रात प्रतिनियुक्तीवर असून, ते सीआयएसएफचे पोलीस महासंचालक आहेत. सध्या सीबीआयचे महासंचालक पद रिक्त आहे. या पदावर त्यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. देशातील वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची निवड प्रक्रियेद्वारे निवड केली जाणार आहे.
सीबीआयच्या महासंचालकपदाची निवड एका समितीमार्फत केली जाणार आहे. या समितीचे प्रमुख पंतप्रधान असतात. सीबीआय प्रमुखांच्या नियुक्तीसाठी या समितीची लवकरच एक बैठक होणार आहे. त्यावेळी जयस्वाल यांच्या नियुक्तीबाबत विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे जयस्वाल यांच्या नियुक्तीबाबत विचार केला जाऊ नये, असं या तक्रारीत म्हटलंय. जयस्वाल यांच्या विरोधात मोक्का कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. जयस्वाल हे या स्पर्धेत राहू शकत नाहीत, असं राजेंद्र त्रिवेदी यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय.
महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावर असताना सुबोधकुमार जयस्वाल हे केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेले. सीआयएसएफच्या महासंचालकपदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. भारतीय पोलीस सेवेतील १९८५ च्या बॅचचे अधिकारी सुबोधकुमार जयस्वाल हे पूर्वी दिल्लीत ‘रॉ’ मध्ये होते. मात्र, दत्ता पडसलगीकर यांचा पोलीस आयुक्त पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर फडणवीस सरकारने सुबोधकुमार जयस्वाल यांची मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली. त्यातच २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं, शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं एकत्र येत महाविकास आघाडी बनवून राज्यात सरकार बनवले. त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्लीतून जयस्वाल यांना केंद्रीय यंत्रणेवर प्रतिनियुक्तीबाबत हिरवा कंदील मिळाला होता. मात्र, जयस्वाल यांनी त्यावेळी नकार दिला होता.




