Top Newsराजकारण

सामुदायिक शक्तीसमोर कोणतीही प्रवृत्ती टिकत नाही; शरद पवारांचे भाजपवर शरसंधान

मुंबई : भाजप एका वेगळ्या विचारांनी चाललेला आणि सामान्यांच्या हितामध्ये यत्किचिंतही आस्था नसलेला हा पक्ष आहे. आज त्यांच्या हातामध्ये देशाची सूत्र गेलेली आहेत. राजकारणात चढउतार असतात. हे चढउतार काही वेळा उच्च ठिकाणी नेऊन बसवतात. पण सामान्यांनी एकदा ठरविल्यानंतर वरच्या स्थानावर कितीही शक्तीशाली व्यक्ती असली तरी सामुदायिक शक्तीसमोर या प्रवृत्ती टिकत नसतात, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर शरसंधान साधलं.

आज परभणी, वर्धा, नांदेड, पुणे येथील अनेक भाजप, वंचित आणि आरपीआयच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. यावेळी शरद पवार पुढे म्हणाले की, आज लोक हळुहळु या विचारावर यायला लागले आहेत. गेल्या आठवड्यातील उत्तर प्रदेशमधील चित्र पाहिले तर १५ दिवसांपूर्वी भाजपचे नेते सांगत होते, उत्तर प्रदेशमध्ये कुणी बघायचेच कारण नाही. पण आज एक दिवस असा जात नाही, जेव्हा भाजपमधील लोक पक्ष सोडून जात आहेत. पक्ष सोडणाऱ्यांमध्ये मंत्री आणि आमदारांचाही समावेश आहे. गोव्यातही हे चित्र दिसायला लागले आहे.

‘त्याचबरोबर, मला खात्री आहे की, जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील नव्या पिढीला, सर्व समाज घटकातील लोकांना सोबत घेऊन एक प्रभावी पक्ष तयार करण्याचा प्रयत्न होईल. या कामात विजय गव्हाणे यांची साथ मिळेल. विजय गव्हाणे हळुहळु चुकीच्या विचारांकडे जे लोक गेले आहेत. त्यांचे मनपरिवर्तन करुन त्यांना पुन्हा राष्ट्रवादीत आणतील. परभणी जिल्ह्याचे सर्व वरिष्ठ नेते आज उपस्थित आहेत. यांच्या सर्वांच्या सामुहिक प्रयत्नाने परभणी जिल्हा प्रागतिक विचारांचा जिल्हा राज्याला दिसेल. तसेच उर्वरीत महाराष्ट्रातही फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार मजबूत करण्याचे काम होईल, अशी आशाही शरद पवार यांनी व्यक्त केली.

१४ जानेवारी हा दिवस माझ्या अंत:करणात कायमचा राहतो. या दिवशी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा जो निर्णय घेतला, तो माझ्या स्वाक्षरीने झाला होता. त्याच्या पूर्वसंध्येला आज प्रदेश कार्यालयात अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होत आहे. फुले-शाहू-आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर आधारीत समाजकारण करण्याची आवश्यकता आहे. त्याला शक्ती देण्याचा निर्णय आज सहकाऱ्यांनी व्यक्त केल्याचंही पवार म्हणाले.

परभणी जिल्हा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा आहे. राजकीयदृष्ट्या जागरूक जिल्ह्यांपैकी एक असलेला हा जिल्हा आहे. एक काळ असा होता १९४७-४८ साली परभणीतील एक मोठा वर्ग काँग्रेस सोबत होता. त्यानंतर जिल्ह्याने एका नव्या पक्षाला साथ दिली, तो पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष. अण्णासाहेब गव्हाणे हे परभणीसह मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते, राज्याच्या विधीमंडळातील एक प्रभावी नेते होते. अण्णासाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुण नेते तयार झाले. घरोघरी प्रागतिक विचार पोहोचवण्यात हे नेतृत्व यशस्वी झाले होते. त्यामुळे अशी पार्श्वभूमी असलेले परभणीकर आणि परभणीचे सर्व सहकारी यांनी हा प्रागतिक विचार घेऊन पुढे आले, त्यापैकीच एक आक्रमक नेतृत्व म्हणजे विजय गव्हाणे आहेत, अशा शब्दात पवारांनी गव्हाणे यांचं कौतुक केलं.

गव्हाणे दोस्तीला पक्के, म्हणूनच मुंडेंसोबत भाजपत गेले

गव्हाणे हे दोस्तीला पक्के आहेत. त्यामुळेच ते त्यांचे मित्र गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत भाजपमध्ये गेले. गोपीनाथ राजकारणात आमचे विरोधक असले तरी त्यांनी व्यक्तिगत सलोखा कधी सोडला नाही. त्यांचा स्वभाव गव्हाणे यांना भावल्यामुळेच ते चौकटीबाहेर जाऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आज आमचे एक सहकारी बापूसाहेब काळदाते हे हयात नाहीत. एक दिवशी मी त्यांच्यासमोर गव्हाणे यांचा विषय काढला होता. काळदाते मला म्हणाले की, गव्हाणे भाजपमधील लोकांना धडा शिकवण्याचा प्रयत्न करतील. जर तिथले लोक शहाणे होत नसतील तर हे तिथून बाहेर पडतील. साहजिकच त्यांनी विचारधारा कधीच सोडली नव्हती. त्यामुळेच ते आज आपल्यासोबत आले आहेत असेही शरद पवार म्हणाले.

भाजपमध्ये अनेकांची कुचंबणा- :जयंत पाटील

आज भाजपमध्ये अनेकांची कुचंबणा होत आहे. म्हणून अनेकजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येऊ इच्छितात असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यावेळी म्हणाले. माजी आमदार विजयराव गव्हाणे यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे पक्षात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वागत केले. मला विश्वास आहे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणाऱ्यांची रीघ लागेल. विजय गव्हाणे यांच्या माध्यमातून मराठवाड्यातील अनेक पदाधिकारी पक्षात येईल असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला. परभणी येथील माजी आमदार विजय गव्हाणे, वर्धातील मनसेचे नेते अतुल वांदिले, पुणे येथील आरपीआयचे नेते प्रदीप साठे, श्रध्दा साठे, नांदेड येथील बाळासाहेब जाधव, डॉ. सोनकांबळे, पैठणमधील किशोर दसपुते आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

मनसेला विदर्भात मोठा धक्का; अतुल वादिंलेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरेंचे शिलेदार विदर्भातील खंदे समर्थक अतुल वांदिले यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. मनसेचं जिल्ह्याकडे दुर्लक्ष होत असून पक्ष बांधणीत कुणीही पुढे येत नाही असा आरोप करत अतुल वांदिले यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे.

अतुल वांदिले यांच्यावर मनसेच्या राज्य उपाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. हिंगणाघाट येथे वांदिले यांचे कार्यक्षेत्र आहे. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे नव्याने राज्याचा दौरा करत पक्ष संघटनेला उभारी देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे मनसेला एकामागून एक धक्के बसत आहेत. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येण्यापूर्वीच मनसेच्या महिला उपाध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाला रामराम केला. त्यानंतर अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

अतुल वांदिले हे तैलिक महासंघाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष आहेत. युवा आणि ओबीसी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. ते हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार होते. त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली होती. मात्र, आता त्यांनी मनसेला रामराम करण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी मनसेला गळती लागली असून पक्षासमोर मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.

मनसेचा विदर्भातील चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अतुल वांदिले यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने पक्षाला बळ मिळणार आहे. मनसे विदर्भात वाढला नाही. राज ठाकरेंवर आमची नाराजी नाही परंतु इतर फळीतील नेत्यांनी कधीही पक्षवाढीसाठी दौरे, कार्यक्रम आखले नाहीत. मग याठिकाणी का थांबायचं असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला होता. त्यामुळे मनसेच्या ३०-४० पदाधिकाऱ्यांसह वांदिले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अतुल वांदिले यांच्या मनसे सोडण्यानं वर्धा जिल्ह्यात पक्षाला मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button