आरोग्य

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; मुंबईही लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात मुंबई, पणे, नागपुरसारख्या शहरांमध्ये कोरोना रुग्णसंख्या लक्षणीय वाढताना दिसत आहे. पुण्यात आता वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवक कडक निर्बंध लागू करण्यात आले असताना आता मुंबईकरही लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहेत. कारण गेल्या आठवड्याभरात मुंबईत कोरोना प्रादुर्भावामुळे सील करण्यात आलेल्या इमारती आणि मजल्यांच्या संख्येत तब्बल २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या BMC माहितीनुसार शहरात ९ मार्चपर्यंत एकूण २२९ इमारती आणि २,७६२ मजले कोरोनामुळे सील करण्यात आले आहेत. २ मार्चच्या आकडेवारीनुसार यात २३ टक्क्यांच वाढ झाली आहे. २ मार्च रोजी मुंबईत एकूण १८५ इमारती आणि २,२३७ मजले सील करण्यात आले होते.
एका इमारतीत पाचहून अधिक रुग्ण आढळल्यास पालिकेकडून संपूर्ण इमारत सील केली जात आहे. पाचपेक्षा कमी रुग्ण असतील संबंधित इमारतीचा फक्त मजला सील केला जात आहे. शहरात आता एकूण सील करण्यात आलेल्या मजल्यांमध्ये ४.५ लाख लोक राहत आहेत. तर सील करण्यात आलेल्या इमारतींमध्ये १.४ लाख लोक राहत आहेत.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार के-पश्चिम विभागात (अंधेरी पश्चिम, विलेपार्ले पश्चिम, जुहू) सर्वाधिक इमारती (एकूण ३४) आणि मजले (एकूण ५१८) सील करण्यात आले आहेत. तर आर-दक्षिण विभागात (कांदीवली, चारकोप) एकूण ३० इमारती आणि एस वॉर्डमध्ये (भांडूप, विक्रोळी, पवई) २८ इमारती सील करण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button