जगात एकीकडे कोरोनाचा कहर, तर दुसरीकडे इस्त्रायल ‘कोरोनामुक्त’
मे महिन्यापासून पर्यटकांना परवानगी; मास्क मुक्ती, शाळांना सुरूवात

जेरुसलेम : इस्रायलने कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली आहे. जगात कोरोनाची दुसरी लाट भेडसावत असताना इस्रायल हा कोरोनामुक्त झाल्याचा एकमेव देश ठरला आहे. कोरोना लसीकरणामुळे इस्रायलला हे यश मिळाले आहे. या देशात कोरोना लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात करुन ९० टक्के लसीकरण पूर्ण केले आहे. त्यामुळे इस्रायलला कोरोनामुक्तीकडे वाटचाल करता आली आहे. इस्रायलमध्ये रुग्णालयात आणि कोविड सेंटरमध्ये फायझर आणि बायोटेकची कोरोना लस देण्यात आली. देशातील १६ वर्षांवरील नागरिकांना मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे रोज सापडणाऱ्या कोरोना रुग्णांचे प्रमाण आता कमी झाले आहे. तसेच इस्रायलमध्ये दाखल होणाऱ्या प्रवाशांचे आणि नागरिकांचे कोरोना चाचणी करुन त्यांना क्वारंटाईन केले जात आहे. त्यांच्यावर काही निर्बंध घालण्यात येत आहे. या देशात आता लोकांना सामाजिक अंतर आणि मास्क वापरण्याचे बंधन घातले जात नाही. तसेच थोड्याच दिवसांत शाळा आणि सगळे व्यवसायही उघडण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
इस्रायलमध्ये आतापर्यंत ८ लाख ३७ हजार १६० जणांना कोरोनाची लागण झाली, तर आतापर्यंत ६ हजार ३३८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जानेवारीच्या सुरुवातीला एका दिवसात या देशात १० हजार रुग्णांची नोंद होत होती परंतु आता इस्रायलमध्ये दिवसाला १०० ते १५० कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. यामागचे कारण म्हणजे इस्रायलमध्ये डिसेंबरला सुरु केलेले लसीकरण, अवघ्या पाच महिन्यांत ८१ टक्के लोकांचे लसीकरण करण्यात आल्यामुळे इस्रायलमध्ये कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याची गरज नाही असे इस्रायलने घोषित केले आहे.




