Top Newsस्पोर्ट्स

मुंबई इंडियन्सचा दणदणीत विजय; ‘प्ले ऑफ’च्या आशा कायम

दुबई : आयपीएलच्या १४ व्या हंगामातील ५१ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघामध्ये पार पडला. ‘प्ले ऑफ’मध्ये जाणाऱ्या चौथ्या संघाचं स्थान मिळवण्यासाठी महत्त्वाचा असणारा हा सामना जिंकत मुंबईने स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे. गुणतालिकेतही झेप घेत थेट पाचवं स्थान मिळवलं आहे.सामन्यात नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजी निवडली. हा निर्णय मुंबईसाठी शंभर टक्के बरोबर ठरला. मुंबईच्या गोलंदाजानी भेदक गोलंदाजी करत राजस्थानच्या संघाला अवघ्या ९० धावांवर रोखलं. ज्यामुळे मुंबईसमोर केवळ ९१ धावांचे सोपे लक्ष्य होते. जे त्यांनी अवघ्या ८.२ ओव्हरमध्ये २ विकेट गमावत पूर्ण केले. यावेळी संघाचा सलामीवीर इशान किशनने धडाकेबाज असं अर्धशतक झळकावत मुंबईचा विजय सोपा केला.

गतविजेता मुंबई इंडियन्सचा संघ आज संपूर्ण ताकदीनं खेळला. नाणेफेकीचा कौल बाजूनं लागल्यानंतर रोहित शर्मानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यावर मुंबईचे गोलंदाज खरे उतरले, विशेष करून पहिलाच सामना खेळणारा जिमी निशॅम व नॅथन कोल्टर-नायल यांनी मिळून सात विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहच्याही नावावर २ विकेट्स राहिल्या. गोलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर फलंदाजांनीही हात धुवून घेतले. त्यांनी राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांची कत्तल करताना मुंबई इंडियन्सला दणदणीत विजय मिळवून दिला. इशान किशननं २५ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारासह नाबाद ५० धावा केल्या.

राजस्थानची सलामीची जोडी एव्हिन लुईस आणि यशस्वी जैस्वाल हे आज अपयशी ठरले. पॉवर प्लेमध्ये लुईस व जैस्वाल यांना अनुक्रमे जसप्रीत बुमराह व नॅथन कोल्टर नाइल यांनी बाद केले. कर्णधार संजू सॅमसनही महत्त्वाच्या सामन्यात अपयशी ठरला. आज संधी मिळालेल्या जिमी निशॅमनं त्याला बाद केलं. ग्लेन फिलिप्सही विचित्र पद्धतीनं बाद झाल्यानं राजस्थानची अवस्था ५ बाद ५० अशी दयनीय झाली.डेव्हिड मिलर व राहुल टेवाटिया राजस्थानला सावरतील असे वाटत होते. पण, मिलर १५ व टेवाटिया १२ धावांवर माघारी परतले. निशॅमनं ४ षटकांत १२ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. नॅथननं १४ धावांत ४ विकेट्स घेतल्या.

चेन्नई सुपर किंग्सचे १९० धावांचे लक्ष्य सहज पार करणाऱ्या राजस्थानला आज मुंबईनं ९ बाद ९० धावांवर रोखले. पण, मुंबईला नेट रन रेट सुधारण्यासाठी हा सामना ९ किंवा त्यापेक्षा कमी षटकांत जिंकण्याचे आव्हान होते. रोहित शर्मा व इशान किशन या नव्या जोडीनं तशी आक्रमक सुरुवातही केली. रोहितला एकदा जीवदान मिळाले, परंतु चेतन सकारियानं त्याला २२ धावांवर बाद केले. सूर्यकुमार यादव झटपट १३ धावा करून बाद झाला. मुंबईनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये २ बाद ५६ धावा केल्या. त्यानंतर हार्दिक पांड्याला बढती देण्यात आली. राजस्थानच्या क्षेत्ररक्षकांनी मुंबईच्या एकेक धावा रोखण्यासाठी जीव ओतून फिल्डिंग केली. पण, इशान किशन आज सुसाट होता, त्यानं चेतन सकारियानं टाकलेल्या ८ व्या षटकात २४ धावा कुटल्या. मुंबईनं ८.२ षटकांत २ बाद ९४ धावा करून हा सामना जिंकला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button