मुख्यमंत्री, शरद पवारांच्या भेटीसाठी संजय राऊतांची ३ दिवसांपासून पळापळ !
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तीन दिवसात दोनवेळा भेट घेतली. संजय राऊत आज वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यानंतर तिथूनच संजय राऊत हे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. संजय राऊत हे दोन दिवसात सातत्याने महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी भेटत आहेत. तीन दिवसापूर्वी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर दोन तास चर्चा झाली होती. त्यानंतर आज दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं झाली. या चर्चेनंतर लगेचच संजय राऊत शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. त्यामुळे महाविकास आघाडीत नेमकं काय चाललंय, याचे आडाखे राजकीय वर्तुळात बांधले जात आहेत.
दरम्यान, शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत सिल्व्हर ओकवरुन बाहेर पडले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी जास्त बोलताना टाळलं. मात्र, ‘मी सहज पवारांना भेटलो. या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. निरोप असेल तर मी माध्यमांनाही नाही शरद पवारांना सांगेन, हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल असं पवार काल म्हणाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचंही कौतुक केलंय. त्यामुळे हे सरकार ५ वर्षे टीकेल’, असा दावा संजय राऊत यांनी केलाय.
ठाकरे-पवार यांच्यात मतभेद?
संजय राऊत यांच्या या धावपळीमागे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ माजल्याचं कारण सांगितलं जात आहे. कारण, सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये असुरक्षितेचं वातावरण आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. गेल्या काही गाठीभेटींच्या पार्श्वभूमीवर पवार आणि ठाकरे यांच्यात काही प्रश्न निर्माण झाले असल्याचं बोललं जात आहे.
यामागे दोन-तीन भेटीगाठीचा संदर्भ सांगितला जात आहे. त्यात शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची झालेली गुप्त बैठक, राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अर्धा तास झालेली वैयक्तिक बैठक, त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली शरद पवार यांची बैठक, या तीन बैठकांचा संदर्भ या राजकीय हालचालींमागे असल्याचं सांगितलं जात आहे.
त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सातत्याने सुरु ठेवलेला स्वबळाचा नाराही या भेटीगाठींमागील एक कारण असल्याचं बोललं जात आहे. एकीकडे काँग्रेस स्वबळाचा नारा देत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती राहील असं या दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे या भेटीगाठीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी या भेटीगाठी सुरु असल्याचंही एक कारण सांगितलं जात आहे.