Top NewsUncategorizedराजकारण

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेण्यावरून भाजपमध्ये मतमतांतरे !

महापौर पेडणेकरांचा भाजपवर पलटवार

मुंबई : मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे, त्यासाठी भाजपची आज एक महत्वपूर्ण बैठक पार पडलीय. त्यानंतर मुंबई महापालिका आमचीच असा नारा भाजप नेत्यांकडून देण्यात आलाय. मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी आणि शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपकडून सर्व पर्यायांची चाचपणी सुरू आहे. भाजपच्या आजच्या बैठकीत मनसेला सोबत घेऊन मुंबई महापालिका निवडणूक लढण्यावरही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चा आहेत. मात्र मनसेच्या उत्तरभरतीय विरोधी भूमिकेमुळे भाजपला नुकसान होणार असेही मत काही नेत्यांनी बैठकीत व्यक्त केले आहे. मनसेला सोबत घेऊन निवडणूक लढण्याचा विचार करताना भाजप सावध पवित्रा घेताना दिसून येत आहे.

मनसेने उत्तर भारतीयांविरोधात नेहमी खळखट्याकची भूमिका घेतली आहे. आणि मुंबई महापालिकेत उत्तर भारतीय मतदारांचा प्रभावही मोठा आहे, त्यामुळे मनसेला सोबत घेतल्यास उलट त्याचे नुकसान भाजपला होण्याची शक्यता जास्त आहेत. त्यामुळे मनसेला सोबत घेण्याबाबत काही नेतेमंडळी अनुकूल नाही. सध्या भाजपची स्थिती मजबूत आहे, त्यामुळे स्वबळावर लढावे असे मत बहुतांश नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आरपीआय आणि रासप सारख्या पक्षांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास सांगणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

यापूर्वीही भाजपाच्या काही बैठकीत मनसेचा मुद्दा चर्चिला गेला आहे. काही दिवसांपूर्वीच नाशकात चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची भेटही चर्चेत राहिली होती. तसेच राज ठाकरेंच्या नव्या शिवतीर्थलाही फडणवीसांनी भेट दिली होती, त्या भेटीचीही चर्चा होती. फक्त फडणवीसच नाही तर भाजपा नेते आशिष शेलार, प्रसाद लाड यांच्याही सतत राज ठाकरे यांच्यासोबत भेटीगाठी होत असतात, त्यामुळे आगामी पालिकेत या भेटीगाठींचा उपयोग कुणाला होणार? आणि मनसे भाजप पालिका एकत्र लढणार का? हे काही दिवसात स्पष्ट होईलच, मात्र आजच्या बैठकीनंतर पुन्हा मनसे-भाजप युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे, एवढं मात्र नक्की.

महापौर पेडणेकरांचा भाजपवर पलटवार

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना आता रंगताना पाहायला मिळतोय. मुंबई महापालिका निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला चारी मुंड्या चीत करत महापालिकेवर भाजपचंच कमळ फुलवण्याचा संकल्प केल्याचं सांगितलं. शेलार यांच्या या दाव्याचा महापौर किशोरी पेडणेकर यांनी चांगलाच समाचार घेतलाय. कमळ फुलणार की कोमेजणार हे निवडणुकीत कळेल, असा इशाराच पेडणेकर यांनी दिलाय.

भाजपच्या बैठकीबाबत बोलताना भाजपला हा पोटशूळ नाही तर मूळव्याध झाला आहे. आगामी पाहिला निवडणुकीत कमळ फुलणार की कोमेजणार हे कळेल. प्रत्येक पक्षाला तयारी करण्याचा अधिकार आहे. महापालिका निवडणुकीत कमळ फुलणार की धनुष्यबाण कमळाचा वेध घेणार हे निवडणुकीनंतरच कळेल, असा खोचक टोला किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलार आणि भाजपला लगावलाय.

भाजपचा संकल्प काय?

आमदार आशिष शेलार म्हणाले की, भाजपचे मुंबईतील प्रमुख पदाधिकारी, खासदार आमदारांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली. मुंबई महापालिका निवडणुका कधीही येवोत. सत्ताधाऱ्यांना चारी मुंड्या चित करण्यासाठीच्या मुंबईतील जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा या स्वरुपाचा सर्व ठोस कार्यक्रम ठरला आहे. त्याच्या रचना लावल्या, काही गोष्टींची उजळणी केलीय, आगामी कार्यक्रमांची तयारी सुरु झाली आहे. या सगळ्या चर्चेतून पुन्हा एकदा नव्या दमाने मुंबई महापालिकेत भाजपचंच कमळ फुलणार हा संकल्प घेऊन आम्ही बैठक केली.

मैदानाला टिपु सुलतान नाव देण्यावरुन जोरदार राजकारण

दुसरीकडे मालाडमधील मैदानाला टिपु सुलतान असे नाव देण्यात येण्याची किंवा दिले गेल्याची कुठेही अधिकृत नोंद नाही. म्हाडाच्या एक्झक्युटीव्ह इंजीनिअरकडून घेतलेल्या माहितीनुसार मालाडमधील मैदानावर २ कोटी ५५ लाख खर्च करुन या दूरवस्थेतील मैदानावर सुविधा देण्यात आल्या आहेत. काँग्रेस नेते आणि मंत्री अस्लम शेख यांच्या पुढाकारातून या सुविधा देण्यात आल्या आणि मैदानाचे नुतनीकरण झाले. शासनाच्या लेखी, महापालिकेच्या लेखी मालाडमधील या मैदानाला टिपू सुलतान या नावाची अधिकृत नोंद नाही. मालाडमधील मैदानाचे नाव कुणालाही विचारताच न घेता टिपु सुलतान असे सांगण्यात आले आहे. उलट आमच्या तेथील नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे की त्या मैदानाला राणी लक्ष्मीबाईंचं नाव देण्यात आलं आहे. जर शिवसेना आंदोलन करतेय की या मैदानाला राणी लक्ष्मीबाईंचं नाव देण्यात यावं अश्यावेळी भाजपचे तेथील कार्यकर्ते कुठे होते? आज टिपु सुलतान नामकरणावरुन विरोध करणाऱ्या भाजपनं यापूर्वी भाजप नगरसेवकांच्याच वॉर्डमधील दोन रस्त्यांना टिपु सुलतान यांचे नाव दिले आहे, असा दावाही पेडणेकर यांनी केलाय.

भाजपाचे सध्याचे आमदार अमित साटम यांनी एम पूर्व वॉर्ड येथील रस्त्याला शहीद टिपू सुलतान मार्ग असे नाव देण्याबाबत २०१३ मध्ये अनुमोदन दिले होते. तर २००१ मध्ये अंधेरी पश्चिम मधील भवन्स कॉलेजमधील रस्त्याला शेर-ए-टिपु सुलतान मार्ग नाव देण्याकरता त्यावेळचे भाजप नगरसेवक विठ्ठल खरटमोल हे सुचक होते, असा दावाही पेडणेकर यांनी केलाय. भाजपला विकासकामात रस नाही, केवळ शिवसेनेला बदनाम करा हीच त्याची भूमिका आहे. मात्र, दरवेळी ते तोंडावर पडतात, असा खोचक टोलाही पेडणेकर यांनी लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button