मुख्यमंत्री कोयनेला पोहोचू शकत नाहीत, दिल्लीला काय पोहोचणार? संदीप देशपांडेंनी उडवली खिल्ली

नाशिक : उद्धव ठाकरे यांनी देशाचं नेतृत्व करावं असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात. पण राऊत काहीही बोलतात. जिथे मुख्यमंत्री कोयनाला पोहोचू शकत नाहीत, तिथे दिल्लीत काय पोचणार? अशी खिल्ली मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उडवली. ते नाशिकमध्ये बोलत होते.
संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी त्यांना शुभेच्छा देताना उद्धव ठाकरेंनी देशाचं नेतृत्व करावं असं म्हटलं होतं. त्यावरुन संदीप देशपांडेंनी खिल्ली उडवली. जिथे मुख्यमंत्री कोयनाला पोहोचू शकत नाहीत, तिथे दिल्लीत काय पोचणार? असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तीन दिवसापूर्वी पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी जात होते. त्यावेळी खराब हवामानामुळे त्यांचं हेलिकॉप्टर कोयनानगर परिसरात लँड होऊ शकलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माघारी फिरावं लागलं होतं. त्यावरुन संदीप देशपांडेंनी निशाणा साधला.