एमपीएससी सदस्यांच्या यादीवरून रोहित पवारांचा राज्यपालांना टोला

पुणे : राज्य शासनाने एमपीएससी सदस्यांची यादी पाठवलीय. विधान परिषद आमदारांची यादी नसल्याने आपण ती यादी तातडीने मंजूर कराल असा विश्वास वाटतो, असा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे. एका युजर्सने ट्विट करुन, ३१ जुलैपूर्वी आपण एमपीएससी आयोगातील रिक्त जागा भरणार होता, त्याचं काय झालं?, असा सवाल विचारला. त्यावर रोहित पवारांनी हे उत्तर दिलं.
ठाकरे सरकारने विधान परिषदेसाठी १२ आमदारांची यादी महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली आहे. परंतु कित्येक महिने उलटून गेली तरी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ती यादी मंजूर केलेली नाहीय. हाच धागा पकडून रोहित पवार यांनी राज्यपालांना चिमटा काढला. ट्विटरवर विकास भारती नावाच्या एका युजर्सने ३१ जुलै च्या आधी एमपीएससी आयोगातील सदस्य भरणार होते, काय झालं? असं सवाल विचारणारं ट्विट केलं. त्या युजर्सच्या प्रश्नाला उत्तरं देणारं ट्विट रोहित पवार यांनी केलं. ज्यातून ३१ जुलै पूर्वीच राज्यपाल महोदयांकडं सदस्यांची यादी पाठवली असल्याचं त्यांनी सांगितलं.
माननीय @AjitPawarSpeaks दादा हे शब्द पाळणारे नेते आहेत. #MPSC च्या सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी सरकारने ३१ जुलै पूर्वीच राज्यपाल महोदयांकडं सदस्यांची यादी पाठवलीय. ती विधान परिषदेच्या आमदारांची यादी नसल्याने महामहीम राज्यपाल महोदय तातडीने मंजूर करतील, असा विश्वास आहे. https://t.co/1mZSklvEHR
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 2, 2021