मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका देशाला बसला आहे. वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्यामुळे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे देशाची स्थिती चिंताजनक झाली आहे. देशात मे महिन्याच्या सुरुवातीला ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला होती. तर एप्रिल-मे या महिन्यांत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या लाखोंनी वाढली आहे यामध्ये फक्त गेल्या २४ दिवसांमधील कोरोना मृत्यूची संख्या ९० हजार आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना केंद्र सरकारने लसींची निर्यात केली परिणामी देशात मृत्यूचा आकडा सातत्याने वाढत गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास जनतेसाठी प्राणघातक ठरतोय अशा शब्दात राष्ट्रवादीकडून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे. देशात कोरोना मृत्यूंचा आकडा तीन लाखांवर गेला आहे. दुसऱ्या लाटेच्या तीव्रतेतही केंद्राने कुंभमेळा, निवडणुका जाहीर केल्या. राज्यांनी लॉकडाऊन शेवटचा पर्याय म्हणून पाहावा, असे जाहीर केले. मोठ्या प्रमाणात लशी निर्यात करण्यात आल्या आहेत. परिणामी देशात मृत्यूचा आकडा सातत्याने वाढत गेला असून ५ एप्रिल २०२१ रोजी देशातील एकूण मृत्यू १ लाख ६५ हजार १०१ होते. त्यानंतर पुढच्या २५ दिवसांत म्हणजे १ मे रोजी देशातील एकूण मृत्यूंची संख्या २ लाख ११ हजार होती. आज देशातील एकूण मृत्यूंचा आकडा ३ लाख ३ हजार ७२० वर पोहोचलाय याचाच अर्थ मागच्या २४ दिवसांत देशात ९० हजार मृत्यू झाले आहेत.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतरही सिस्टीमचा कल आपण कोरोना काळात कसे चांगले काम केले आहे, हे दाखवण्याकडे आहे. पण गंगाकिनारी दफन केलेले हजारो मृतदेह केंद्र सरकारच्या अपयशाची साक्ष देतात. केवळ अश्रू ढाळून सहानुभूती मिळवण्याने या अपयशाची जबाबदारी झटकता येणार नाही असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
देशातील एकूण मृत्यूंमध्ये महाराष्ट्राची आकडेवारी जास्त आहे. पण महाराष्ट्राने सुरुवातीपासून कोणतीही लपवाछपवी केलेली नाही. याउलट गुजरात, उत्तर प्रदेश या भाजपशासित राज्यात मृत्यूंची आकडेवारी मोठ्या प्रमाणात लपविण्यात आली आहे. उपचाराअभावी घरीच मृत्यू झालेल्या रुग्णांना कोरोना मृत्यूच्या आकडेवारीतून वगळण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतरही सिस्टीमचा कल आपण कोरोना काळात कसे चांगले काम केले आहे, हे दाखवण्याकडे आहे. पण गंगाकिनारी दफन केलेले हजारो मृतदेह सिस्टीमच्या अपयशाची साक्ष देतात. केवळ अश्रू ढाळून सहानुभूती मिळवण्याने या अपयशाची जबाबदारी झटकता येणार नाही.
पंतप्रधान मोदी भावूक झाले?
कोरोनाने देशात लाखो लोकांनी जीव गमावले. यामुळे मोदी सरकारच्या विरोधात जनआक्रोश निर्माण होत आहे. अशातच व्हिसी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. पण ते खरंच भावूक झाले की हे चित्र निर्माण करण्यात आले, याबाबत आता लोकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मोदी मुख्यमंत्र्यांसोबत व्हिसीद्वारे चर्चा करताना नेहमीच उपरणे व मास्क वापरतात. मात्र त्यादिवशी त्यांनी उपरणे व मास्क दोन्ही वापरले नाही याचा अर्थ हा ठरवून झालेला कार्यक्रम होता, असा आरोपही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी मोदींवर केला आहे.