Top Newsराजकारण

गोव्यात मायकल लोबोंचा सपत्नीक काँग्रेसमध्ये प्रवेश

पणजी : गोवा सार्कमधील मंत्री मायकल लोबो यांनी सोमवारी भाजपला सोडचिट्ठी दिली असून त्यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासह त्यांची पत्नी डिलायला लोबो यादेखील काँग्रेस पक्षात आल्या आहेत. भाजपला सातत्यानं घरचा आहेर देण्याच्या नेत्यांपैकी मायकल लोबो हे एक होते. त्यांनी गेल्या वर्षभरात अनेकदा भाजपला घरचा आहेर देत भाजपच्या मंत्रिमंडळातील नेत्यांशी पंगा घेतला होता.

भाजप सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक प्रभूपाऊसकर तसंच मॉविन गुदिन्हो यांच्यासोबत मायकल लोबो यांचे खटके उडाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. अशातच आता ऐक निवडणुकीचा कार्यक्रम जवळ आलेला असताना त्यांनी भाजपला राम-राम केलाय. सपत्नीक मायकल लोबो हे काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. काँग्रेस नेत्यांनीही त्यांचं जंगी स्वागत केलं आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं प्रसिद्ध असलेला हा मतदारसंघ गोव्यातील महत्त्वाचा मतदारसंघ असून उत्तर गोव्यातील या मतदारसंघात मायकल लोबो यांनी नेहमीच आपलं वर्चस्व राखलं आहे. त्यांच्या काँग्रेसप्रवेशामुळे आता गोव्यातील राजकारण अधिकच रंगतदार स्थितीत आलं आहे.

दरम्यान, गोवा भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून नेमणूक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मायकल लोबो यांच्या कळंगुटमधील घरी गेले होते. त्यांच्या घरी जाऊन फडणवीसांनी मायकल लोबोंची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान, महत्त्वपूर्ण चर्चा झाली नसेल, अशी शक्यता कमीच आहे. अत्यंत आक्रमक झालेल्या मायकल लोबो यांना थंड करण्याचे प्रयत्न देवेंद्र फडणवीसांकडून झाले असावेत, असे तर्क त्यावेळी राजकीय जाणकारांनी वर्तवले होते.

मायकल लोबो यांची पत्नी डिलायला लोबो या उत्तर गोव्यातील शिवोली मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होत्या. अनेक दिवसांपासून आपल्या पत्नीला भाजपकडू तिकीट मिळावं, यासाठी लोबोंचे प्रयत्न सुरु होते, असंही सांगितलं जातं. दरम्यानच्या काळात मायकल लोबो यांनी अमित शाह यांची भेटही घेतली होती. दिल्लीतही त्यांनी वरीष्ठ नेत्यांसोबत आपल्या मागण्यांबाबत चर्चा केल्यानं गोव्यातील खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं आहे. अशातच आता काँग्रेसकडून आपल्या मनोकामना पूर्ण होतील, या इराद्यानं त्यांनी काँग्रेस प्रवेश केला आहे. येत्या निवडणुकीत डिलायला लोबो शिवोलीतून तर मायकल लोबो हे कळंगुटमधून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवताना दिसले, तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button