राजकारण

अधिवेशनातील गदारोळाच्या पार्श्वभूमीवर मोदी, शहा आणि सोनिया गांधी यांच्यात बैठक

नवी दिल्ली : पावसाळी अधिवेशनात प्रचंड गदारोळानंतर बुधवारी लोकसभेची कार्यवाही अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाची बैठक बोलावली. संसदेतील कामकाज सुरळीत चालवण्यासाठी विरोधकांसोबत एकमत करणे, हा या बैठकीचा उद्देश आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी उपस्थित होते.

वरील नेत्यांशिवाय बैठकीत तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, द्रमुकचे टी.आर. बालू, अकाली दलचे सुखबीर सिंह बादल, वायएसआर काँग्रेसचे मिथुन रेड्डी, बीजू जनता दलाचे पिनाकी मिश्रा, जेडीयूचे राजीव रंजन सिंह लल्लन, बीएसपीचे रितेश पांडेय आणि तेलंगाणा राष्ट्र समितीचे नामा नागेश्वर रावदेखील उपस्थित होते.

या बैठकीत ओम बिर्ला यांनी चांगली चर्चा आणि संवाद होण्यासाठी विरोधकांना आवाहन केले. ते म्हणाले की, ज्या प्रकारे काही खासदारांचे संसदेत वर्तन होते, ते योग्य नव्हते. संसदेची मर्यादा राखायला हवी. सर्व पक्षांनी याबाबत विचार करावा. बैठकीनंतर मीडियाशी बातचीतमध्ये बिर्ला यांनी संसदेतील कार्यवाहीवर नाराजी व्यक्त केली. संसदेत जबाबदारीचे काम असते, त्यामुळे काही मर्यादा पाळायला हव्या. कागद फाडणे, फलक दाखवणे आणि घोषणा देणे, ही संसदेची परंपरा नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button