
मुंबई : रझा अकादमीच्या मोर्चाचे हिंसक वळण आणि अमरावतीत बंदच्या आवाहनानंतर उफाळलेला हिंसाचार पाहता राज्यातील तणावाच्या परिस्थितीवर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. औरंगाबाद येथे एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. खरे दंगलखोर कोण आहेत ? हे महाराष्ट्राला लवकरच कळेल. महाराष्ट्रात दंगली घडवण्याचे कारस्थान सुरू आहे. मला विरोधकांना इतकच सांगायचे आहे की मांजर डोळे मिटून दूध पित असली तरीही कळत. हे डोळे मिटून दूध पिण बंद करा, असेही राऊत म्हणाले. बंद पुकारलेल्यांनीच दंगल घडवली असाही आरोप त्यांनी विरोधकांवर केला. राज्य सरकार अस्थिर करायचे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा, मग कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून राज्यपालांना भेटायचे. मग राज्यपालांच्या माध्यमातून गृहखात्याला माहिती द्यायची. मग राष्ट्रपती राजवट लावायची हे खेळ आता सुरू राहतील. तुम्ही असे कितीही खेळ केले तरीही आम्ही या खेळात माहिर आहोत. हे आमचे सरकार संपुर्ण पाच वर्षे काम करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
रझा अकादमी वगैरे झूठ आहे, रझा अकादमीची एवढी ताकदच नाही. चार टाळकी नाहीत, त्यांना माणसं पुरवली गेलीत दंगल करायला, असाही आरोप राऊतांनी यावेळी केला. हे सगळ ठरवून चालले आहे. विरोधी पक्षाने महाराष्ट्राला चूळ लावण्याचा प्रयत्न करू नये. या महाराष्ट्र राज्याला एक परंपरा आणि प्रतिष्ठा आहे. हे महाराष्ट्र राहून तुम्हाला जपता येत नसेल तर तुम्ही महाराष्ट्राचे सर्वात मोठे शत्रू आहात.
गृहखाते कोणाकडे आहे, हे म्हणणे चुकीचे आहे. महाराष्ट्र विकास आघाडीकडेच आहे. राज्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहे. त्यामुळे इधर उधरकी बाते बंद करो असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला. दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्यात येईल. खरे दंगलखोर हे वेगळेच आहेत, अशीही प्रतिक्रिया राऊतांनी दिली.
फक्त नकाब नाही, तर कपडेही उतरतील, इंटरव्हलनंतर माझी एंट्री
नवाब मलिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ही लढाई पुढे अशीच सुरू राहिल. अजूनही काही गोष्टी समोर आल्या नाहीत. फक्त नकाब नाही, तर कपडेही उतरली आणि म्हटल्याप्रमाणे इंटरव्हलनंतर माझी एंट्री होईल, असे संजय राऊत म्हणाले.
पुढे राऊत म्हणाले की, हे प्रकरण वेळीस संपावे, अशी आमची इच्छा होती. पण भाजपला अजूनही शहानपणा येत नसेल, तर आम्हाला असं वाटतं ही लढाई सुरुच राहील आणि अजूनही काहीच समोर आलं नाही. मी असं मागे देखील म्हणालो होता की, इंटरव्हलच्यानंतर माझी एंट्री होईल. नवाब मलिकांचा इंटरव्हल झालेला नाही, हा चित्रपट मोठा असणार आहे. जे आमच्या अंगावर पाठी मागून वार करायला येतायत किंवा महिलांना अपमान करायचा नाही, पण मर्दासारखे समोर या. दुसऱ्यांचे खांद्ये आणि दुसऱ्यांचे गंजलेल्या बंदुका, तलवारीतून आमच्यावरती हल्ले करू नका, आम्ही तुम्हाला घाबरत नाही.
आज सकाळी नवाब मलिकांनी ‘उतरेंगे और कई नकाब’ असे ट्वीट केलं होत. त्यावर राऊत म्हणाले की, ‘फक्त नकाब नाही कपडे उतरलीत. नकाब ही छोटी गोष्टी आहे. तुम्ही पाहत राहा काय होतंय. आमचे नवाब मलिक सगळ्यांना भारी पडले आहेत. त्यांच्या लढाईला नैतिक बळ आहे. मुख्यमंत्र्यांसह राज्य मंत्रिमंडळाचा त्यांना पाठिंबा आहे आणि मलिक चुकतायंत असं राज्यातील जनतेला वाटत नाही.




