राजकारण

मी पाटील आहे, संजय राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो; चंद्रकांत पाटलांचा इशारा

पुणे: मी कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावचा पाटील आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यापेक्षा भयानक बोलू शकतो. पण त्यांना कळेल म्हणून तशी भाषा वापरणे ही माझी संस्कृती नाही, असे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांना दिलं.

ते मीडियाशी बोलत होते. राऊत यांनी त्यांच्या शिवराळ भाषेचे समर्थन करताना समोरच्याला कोणती भाषा कळते, त्या भाषेत आपण बोलतो, असं म्हटल्याचं चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवतानाच भाजप नेते किरीट सोमय्या यांचं समर्थनही केलं. तसेच सोमय्यांबाबत राऊत यांनी वापरलेली भाषा अत्यंत चुकीची आहे, असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

तेलंगणचे मुख्यमंत्री मुंबईत आले व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटून भाजपाविरोधी प्रादेशिक पक्षांची आघाडी तयार करण्याची चर्चा केली. त्याविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारलं असता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी असेच बिगरभाजप पक्षांचे महागठबंधन तयार केले होते. आता भाजपला बहुमत मिळणार नाही अशी हवा निर्माण केली होती. तरीही त्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपच्या जागा वाढून पक्षाला ३०३ जागांसह पूर्ण बहुमत मिळाले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा आणखी वाढतील. पण भाजपाविरोधी पक्षांनी आशा ठेवायला आणि प्रयत्न करायला हरकत नाही.

महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनाही त्यांनी प्रतित्युत्तर दिलं आहे. २०२४ मध्ये काँग्रेसला बाजूला ठेऊन सगळे एकत्र येणार आहेत. त्यामुळे शुभारंभालाच फाटाफूट झाली आहे. उद्घाटनाचा नारळ फोडतानाच फाटाफूट ठरलेली आहे. २०२४ ला बँडबाजा वाजणारच आहे. राजकारणात स्वप्न बघायला काही हरकत नसते, असा टोला त्यांनी लगावला.

रिपाइं नेते रामदास आठवले यांनी शिवसेना-भाजप एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजप-सेनेने एकत्र यावे ही रामदास आठवले मनापासून त्यांची इच्छा व्यक्त करत आहेत. पण आपण जी इच्छा व्यक्त करतो तसं होतच असं नाही. जरी छगन भुजबळ मला भविष्य सांगणार जोशीबुवा असं म्हणाले असले तरी मी भविष्य सांगणारा जोशीबुवा नाही. त्यामुळे नजीकच्या काळात भाजप – सेना एकत्र येतील की नाही हे मला माहिती नाही, असं त्यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button