राजकारण

संभाजीराजेंची हेरगिरी करण्याचा प्रश्नच नाही, त्यांचा गैरसमज दूर : वळसे-पाटलांचं स्पष्टीकरण

मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं असताना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी संभाजीराजे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलाय. राज्य सरकारकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचं ट्विट संभाजीराजे यांनी केलं होतं. त्यावर आता गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय. संभाजीराजेंवर पाळत ठेवण्याचा किवा हेरगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांचा गैरसमज पूर्णपणे दूर केल्याचं वळसे पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलंय.

आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केलाय. राज्याचा इंटेलिजन्स विभाग पाळत ठेवत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्याबाबत संभाजीराजे यांच्या ट्वीटमुळे एकच खळबळ उडाली आहे. या ट्वीटमध्ये संभाजीराजे यांनी केंद्र की राज्य सरकार असा उल्लेख केलेला नाही. मात्र राज्य सरकारच्या इंटेलिजन्स विभागाकडून संभाजीराजे यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचं संशय व्यक्त केला जातोय.

वळसे-पाटलांचं स्पष्टीकरण

संभाजीराजे यांनी हेरगिरीचा आरोप केल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी त्याबाबत आता स्पष्टीकरण दिलं आहे. ‘छत्रपती संभाजी राजेंवर पाळत ठेवण्याचा किंवा हेरगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते राज्यभर करत असलेल्या दौऱ्यांदरम्यान कोणतीही सामाजिक अपप्रवृत्ती त्यांच्या कार्यक्रमात विघ्न आणू नये म्हणून पुरेसा बंदोबस्त सिंधुदुर्ग दौऱ्यात नेमण्यात आला होता. यासंदर्भात माझी संभाजीराजेंशी चर्चा झालेली आहे आणि त्यांचा गैरसमज पूर्णपणे दूर झालेला आहे’, असं ट्विट वळसे-पाटील यांनी केलं.

दरम्यान, संभाजीराजे यांनी हेरगिरीचा आरोप केल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी त्यांना फोन केला आणि त्यांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं. तशी माहिती संभाजीराजे यांनीच ट्विटरद्वारे दिली आहे. “आताच गृहमंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितले, खालच्या कर्मचाऱ्यांची बैठकीच्या ठिकाणी आत जिल्हाधिकारी चेंबरमध्ये येण्याची चूक झाली. परंतु त्यांचा उद्देश हेरगिरीचा नव्हता. माझ्या सुरक्षेच्यादृष्टीने त्यांनी तसे केले असावे. मी सुद्धा त्यांच्या या वक्तव्यावर समाधानी असून. हा विषय संपला आहे”, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button