मुंबई : ब्रिक्स इंटरनॅशनल फोरम (ब्रिक्स-आयएफ) हे एक सामाजिक-आर्थिक-राजकीय केंद्र आहे. जे ब्रिक्स राष्ट्रांमध्ये लोक-ते-लोकसंवाद सुरू करण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोविड- १९ काळात केलेल्या त्यांच्या उत्कृष्ट सामाजिक बांधिलकीबद्दल ब्रिक्स इंटरनॅशनल फोरमकडून २०२१ च्या उत्कृष्टतेच्या पुरस्काराने डॉ. सर्गेई द्वोरियानोव (ब्रिक्स रशियाचे प्रमुख) आणि डॉ. पूर्णिमा आनंद (ब्रिक्स इंटरनॅशनल फोरम इंडिया) यांच्या हस्ते महापौर किशोरी पेडणेकर यांना ऑनलाइन समारंभात पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
आगामी काळात दिल्लीत होणाऱ्या संमेलनात महापौरांना निमंत्रित करण्यात आले आहे. महापौर किशोरी पेडणेकर सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या की, कोविड -१९ काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेली दखल व सदरहू पुरस्कार हा माझ्या मुंबईकर नागरिकांना समर्पित करीत आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच आज कोविडच्या तिसऱ्या लाटेला थोपविणे शक्य झाले आहे. सदरहू फोरमने माझी दखल घेऊन सन्मानित केल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. तसेच कोविड संपल्यानंतर रशियन व्यावसायिक शिष्टमंडळाने मुंबईला भेट द्यावी, असे निमंत्रण महापौरांनी यावेळी दिले.