राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; पोलिसात तक्रार दाखल

औरंगाबाद: कोरोना संकट काळात मास्क घालण्याचं आवाहन केलं जात असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मात्र मास्कशिवाय फिरताना दिसतात. काही दिवसांपूर्वी राज यांना याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी मास्क न घालण्याचं आवाहन इतरांना केलं. यावरून ऍड. रत्नाकर चौरे यांनी औरंगाबादच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राज यांच्या आवाहनामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या एका कार्यक्रमात राज ठाकरे विनामास्क दिसले. यावेळी पत्रकारांनी विचारलं असता, मी मास्क घालतच नसल्याचं ते म्हणाले. यानंतर नाशिक दौऱ्यात माजी महापौर अशोक मुर्तडक यांना राज ठाकरेंनी मास्क उतरवण्यास सांगितलं होतं. राज ठाकरे मास्क न घालण्याचं आवाहन करत असल्यानं राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचं रत्नाकर चौरेंनी तक्रारीत म्हटलं आहे.
कोरोचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सरकार आणि प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात जनजागृतीदेखील केली जात आहे. मात्र राज ठाकरेंसारखा जबाबदार नेता मास्क न घालण्याचं आवाहन करतो. त्यांचा अनुनय करणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. राज ठाकरेच मास्क घालू नका, असं सांगत असतील तर तर लोक त्याला का फॉलो करणार नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. साथीचे रोग प्रतिबंधात्मक कायद्याखाली राज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील त्यांनी केली.