Top Newsराजकारण

तुमच्या हातात असेल, तर आताच अटक करा; संजय राऊतांचे चंद्रकांतदादांना आव्हान

शिरुर : शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना डिवचले आहे. राज्यपालांवर मी टीका केली नाही. तुम्हाला तसं वाटत असेल तर आताच अटक करा, असं आव्हानच संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.

संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे आव्हान दिलं आहे. मी राज्यपालांवर टीका केली नाही. राज्यपाल आमच्यासाठी नेहमीच आदरणीय आहेत आणि राहतील. तुमच्या हातात असेल तर मला आता अटक करा, असं राऊत म्हणाले. राऊतांच्या दंडात ताकद आहे का? या चंद्रकांत पाटील यांच्या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं आहे. शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढला. तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करा म्हणता का? इतिहास समजून घ्या. आमच्या दंडाशी बरोबरी करू नका. आमच्याकडे दंड आणि दांडा दोन्ही ही असतो, असा इशारा त्यांनी दिला.

राऊत पवारांसाठी काम करतात की शिवसेनेसाठी? असा सवालही चंद्रकांतदादांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला होता. त्यावरही राऊत यांनी पलटवार केला आहे. कधी काळी नरेंद्र मोदी शरद पवारांसाठी काम करत होते. आज ते देशाचे नेते आहेत. आमचे दोघांचे संबंध आहेत. ते कायम राहतील. शरद पवारांचा पक्ष आणि शिवसेनेची आघाडी आहे. चंद्रकांत दादांनी त्याची चिंता करू नये. सरकार पडणार पडत नाही आणि पडणारही नाही, असंही त्यांनी सांगितलं.

मानसिक स्वास्थ नीट करा

राऊत यांना चंद्रकांतदादांनी कंपाऊंडर म्हणून टोमणा मारला होता. त्यावरही त्यांनी सडकून टीका केली. त्यांनी आपलं मानसिक स्वास्थ्य नीट केलं पाहिजे. सरकार येत नाही म्हणून ते वैफल्यग्रस्त आहेत, असा हल्ला राऊतांनी चढवला.

चंद्रकांत पाटील यांनी काल राऊतांवर टीका केली होती. कोरोनाची तिसरी लाट येणार नाही हे भाकीत करण्यासाठी मी काही उद्धव ठाकरेंसारखा डॉक्टर नाही आणि संजय राऊतांसारखा कंपाउंडर नाही. तिसरी लाट येऊ शकते का नाही हे माहीत नाही. पण कोव्हीड फक्त उद्धव ठाकरे यांच्याशी बोलतो माझ्याशी बोलत नाही, असा खोचक टोला पाटील यांनी लगावला होता. यापूर्वी राज्यातील मंदिरे उघडण्यावरुनही चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता.

आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही. समोरून कोथळा बाहेर काढतो, राऊत यांच्या या वक्तव्याचा पाटील यांनीही चांगलाच समाचार घेतला. हम किसी को टोकेंगे नही, अगर किसीने टोका तो छोडेंगे नही, असं पाटील म्हणाले. संजय राऊत यांनी जे विधान केलं आहे. त्यावर उद्धव ठाकरे काय अ‍ॅक्शन घेणार आहेत हे त्यांनी सांगावं. नारायण राणेंनी एक थोबाडीत मारली असती तर असं म्हटलं होतं. त्यावर त्यांना अटक केली. मग कोथळा काढला असता किंवा कोथळा काढू यावर काय करणार आहात? हे उद्धव ठाकरेंनी ठरवावं, असं पाटील म्हणाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button