कोलकाता : पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर CISF च्या जवानांनी केलेल्या गोळीबारानंतर पश्चिम बंगालमध्ये मोठा गदारोळ उठला आहे. या गोळीबारात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या की, घटनास्थळी जाण्यापासून मला रोखण्यासाठी ७२ तास बंदी घालण्यात आली आहे. शनिवारी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, आयोगानं कोणत्याही नेत्यास त्याठिकाणी जाण्यास ७२ तासांची बंदी घातली आहे.
त्यामुळे निवडणूक आयोगावर निशाणा साधताना ममता म्हणाल्या की, ‘निवडणूक आयोग वस्तुस्थिती दडपण्याचा प्रयत्न करत आहे. सीतलकुचीमधील ग्रामस्थांवर अंदाधुंद करण्यात आला आहे. अशा परिस्थिती नेत्यांना कूचबिहारला जाण्यापासून रोखणं हे निवडणूक आयोगाचं अभूतपूर्व पाऊल आहे. सीतलकुचीला जायची माझी इच्छा आहे.’
नागरिकांना जाणीवपूर्वक गोळ्या घातल्या असल्याचा आरोपही ममतांनी यावेळी केला आहे. त्या म्हणाल्या की, ‘हा एक नरसंहार आहे. त्यांच्या मते, सुरक्षा कर्मचार्यांनी जमावाच्या शरीराच्या खालच्या भागावर गोळीबार करायला हवा होता. पण त्यांनी नागरिकांच्या सर्व अंगावर गोळ्या झाडल्या आहे. या दुर्दैवी घटनेत ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या गळ्यावर आणि छातीवर गोळ्या लागल्या आहेत.
संबंधित गोळीबार हा आत्मरक्षणासाठी केला असल्याची माहिती आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. आयोगाच्या या स्पष्टीकरणावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. संबंधित केंद्रीय सुरक्षा दलाची आणि या घटनेची सीआयडी चौकशी करण्याची मागणीही ममता यांनी यावेळी केली आहे. शिवाय सुरक्षा दलाच्या दाव्यानुसार, ग्रामस्थांनी सुरक्षा दलाला घेरल्याचा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही, असंही ममता यांनी यावेळी म्हटलं.