Top Newsराजकारण

भवानीपूरमध्ये ममतांना भाजपतर्फे प्रियंका टिबरेवाल टक्कर देणार

कोलकाता : पश्चिम बंगालमधील भवानीपूर विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीसाठी डावपेचांना सुरुवात झाली आहे. एकीकडे ममता बॅनर्जी आज भवानीपूरमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर दुसरीकडे भाजपने प्रियांका टिबरेवाल यांना ममतांविरोधात उमेदवार म्हणून घोषित केले आहे. या जागेसाठी भाजप एखाद्या वरिष्ठ नेत्याला उमेदवारी देईल, असा कयास लावला जात होता. मात्र, त्यांनी महिला कार्डावरच विश्वास दाखवला आहे. भाजपने ट्विट करत ही माहिती दिली आहे. यात, टिबरेवाल यांच्याशिवाय, जंगीपूरमध्ये सुजीत दास तसेच, समरेसगंज येथे मिलन घोष यांना उमेदवारी दिली आहे.

ममता बॅनर्जींसाठी ही पोटनिवडणूक अत्यंत महत्वाची आहे. कारण या निवडणुकीत त्यांचे मुख्यमंत्री पदच पणाला लागले आहे. यापूर्वी, मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम जागेववर सुवेंदू अधिकारी यांनी ममतांचा पराभव केला होता. मात्र, यानंतरही त्या मुख्यमंत्री झाल्या. अशा परिस्थितीत, मुख्यमंत्री झाल्यानंतर पुढील ६ महिन्यांच्या आत त्यांना आमदार होणे आवश्यक आहे. यामुळेच भवानीपूरची निवडणूक ममता बॅनर्जींसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

भाजप नेते बाबुल सुप्रियो यांच्या कायदे विषयक सल्लागार असलेल्या प्रियंका तिबरीवाल यांनी ऑगस्ट २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपले प्रेरणास्थान आणि राजकारणातील आदर्श मानतात. भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांच्या सल्ल्यानंतरच प्रियंका भाजपमध्ये सामील झाल्या. २०१५ मध्ये, प्रियांका तिब्रिवाल यांनी भाजपकडून कोलकाता नगरपरिषदेची निवडणूकही लढली होती. त्या प्रभाग क्रमांक ५८ (अँटली) मधून उभ्या होत्या. परंतु तृणमूल काँग्रेसच्या स्वपन समदार यांच्याकडून त्यांचा पराभूत झाला होता. भाजपमधील सहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाची कामे केली आणि ऑगस्ट २०२० मध्ये त्यांना पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष करण्यात आले.

टिबरेवाल यांनी २०२१ मध्ये अँटलीमधून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, टीएमसीचे स्वर्ण कमल साहा यांच्याकडून त्यांचा ५८,२५७ मतांनी पराभव झाला होता. तिबरीवाल यांचा जन्म ७ जुलै १९८१ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण वेलँड गोल्डस्मिथ स्कूलमधून पूर्ण केले. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली. यानंतर, २००७ मध्ये त्यांनी कोलकात्ता विद्यापीठांतर्गत असलेल्या हजरा लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. यानंतर त्यांनी थायलंडमधून एमबीएही केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button