राजकारण

नाशिकमध्ये सोमवारपासून मॉल सुरू; शनिवार-रविवारी पर्यटनस्थळं बंद : भुजबळ

नाशिक: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती आणि पर्यटनस्थळावर होणारी पर्यटकांची गर्दी या पार्श्वभूमीवर पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही शनिवार-रविवारी पर्यटन स्थळं बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच सोमवारपासून जिल्ह्यातील मॉलही सुरू करण्यात येणार आहेत. नाशिकचे पालक मंत्री छगन भुजबळ यांनी तशी घोषणा केली आहे.

भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. पाऊस सुरू झाल्याने नाशिकमध्ये पर्यटनस्थळावर गर्दी वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. परिणामी शनिवार आणि रविवारी जिल्ह्यातील पर्यटन स्थळ बंद ठेवण्यात येणार आहे. पर्यटनस्थळांवरील गर्दी टाळण्यासाठी या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. तसेच कालसर्प आणि नारायण नागबळीबाबत शासन स्तरावर निर्णय घेतला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

नाशिकचा मृत्यूदर १.७४ टक्के आहे. मृत्यू संख्या लपवणे हा उद्देश नाही. खासगी रुग्णालयातील माहिती अपूर्ण आहे. ही टेक्निकल चूक असून दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे. तर जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ४.७४ टक्के आहे. जिल्ह्यात ९ टक्के बेड फुल आहेत. जिल्ह्याला ४०० मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. आपल्याकडे सध्या १५५ मॅट्रिक टन ऑक्सिजन आहे, असं त्यांनी सांगितलं. नाशिकमध्ये अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय पुढील आठवड्यात घेतला जाणार आहे. तसेच त्र्यंबकेश्वर धार्मिक विधी सुरू करण्याचा निर्णय राज्यस्तरावर होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

येत्या सोमवारपासून मॉल सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुपारी ४ वाजेपर्यंतच मॉल सुरू ठेवता येणार आहे, असं सांगतानाच मॉलच्या कर्मचाऱ्यांचं तातडीने लसीकरण करा, असे आदेशही त्यांनी दिले.

ओबीसी आरक्षणावर भाजने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ओबीसींसाठी भाजप आंदोलन करत आहे ही चांगली गोष्ट आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो. ओबीसींच्या आरक्षणासाठी त्यांनी केंद्र स्तरावरही पाठपुरावा करावा. जनगणना आणि डेटा हा विषय केंद्राकडे आहे. अनेकवेळा पत्रव्यवहार केला. त्याला अद्याप उत्तर आलं नाही. केंद्र सरकार टोलवाटोलवी करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. कोरोना काळात डेटा गोळा करण्याचं काम कोण करणार? आहे तो डेटा केंद्राने दिला पाहिजे, या मागणीसाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. ओबीसी संघटनाही कोर्टात दावा करणार आहे, असं सांगतानाच वेळप्रसंगी आम्ही भाजपची मदतही घेऊ, असा चिमटाही त्यांनी काढला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button