कायदा फुलप्रूफ असता तर राज्यपालांची भेट घ्यावी लागली नसती; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला
मुंबई : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही फुलप्रूफ कायदा दिला होता, पण या सरकारला टिकवता आला नाही, असं म्हटलं होतं. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना टोला लगावला.
मराठा आरक्षणाचा कायदा फुलप्रूफ असता तर राज्यपालांना भेटण्याचा योग आला नसता, असा टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. “फुलप्रूफ कायदा होता तर त्याचं काय झालं ते सगळ्यांच्या समोर आहे…म्हणूच आम्हाला राज्यपालांना भेटायला यावं लागलं. तो जर का फुलप्रूफ असता तर आज भेटण्याचा योग यासाठी आला नसता,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका
यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मराठा आरक्षणाचा कायदा तयार करताना आमच्यासोबत असलेले आणि कायदा बनल्यानंतर त्याचे श्रेय घेणारे आज म्हणतात की, कायदा ‘फुलप्रूफ’ नव्हता. त्यामुळे किती हा दुटप्पीपणा? अशी खोचक टीका फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा कायदा केला होता. हा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. यामुळे मराठा आरक्षण प्रकरणी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत मराठा आरक्षण कायद्या संदर्भात निवेदन दिले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. फडणवीस सरकारच्या काळात तयार करण्यात आलेला कायदा फुलप्रुफ नव्हता असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय यावर फडणवीसांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मराठा आरक्षणाचा कायदा तयार करताना आमच्यासोबत असलेले आणि कायदा बनल्यानंतर त्याचे श्रेय घेणारे आज म्हणतात की, कायदा‘फुलप्रूफ’ नव्हता!.. किती हा दुटप्पीपणा?.. मग प्रश्न उपस्थित होतो की, भाजपा सरकारच्या काळात हाच कायदा हायकोर्टात वैध ठरतो आणि सर्वोच्च न्यायालय सुद्धा स्थगिती देण्यास नकार देते. आणि नव्या सरकारच्या काळात स्थगिती मिळते आणि कायदाही अवैध ठरतो. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण? आशा आशयाचे ट्विट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.