Top Newsराजकारण

पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यासाठीच केंद्राचा खटाटोप; चन्नी यांचा आरोप

पंतप्रधानांवर संकट ओढावले, तर पहिली गोळी मी खाईन !

फिरोजपूर:पंजाबच्या फिरोजपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटींबाबत राज्याचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचा पुनरुच्चार केला आहे. तसेच, पंतप्रधानांवर संकट ओढावले, तर पहिली गोळी खाणारा मी असेन, असेही ते म्हणाले. याशिवाय, केंद्र सरकार पंजाबची प्रतिमा मलिन करत असल्याचा आरोप चरणजीत चन्नींनी केला.

एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत चन्नी म्हणाले की, पंतप्रधानांना हेलिकॉप्टरने यायचे होते, पण अचानक त्यांनी रस्ते मार्गाने येण्याचा निर्णय घेतला. आमच्याकडून कुठलीही चूक झाली नाही, तरीदेखील आमच्या अधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या जात आहेत. आमच्याकडून पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीही त्रुटी नसताना त्यांना नोटीस का दिली जात आहे? केंद्र सरकारने मुख्य सचिव आणि डीजीपी यांना नोटीस पाठवली आहे. निवडणुकीपूर्वी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा केंद्राचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.

पंजाबी आणि पंजाबला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकमेकांवर प्रश्न उपस्थित केले तर अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात. सुरक्षेतील त्रुटींबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर बोलताना ते म्हणाले की, त्या दिवशी जे घडले, त्यात चूक कोणाची होती आणि सुरक्षेची जबाबदारी कोणाला उचलावी लागेल, यावर चौकशी होईलच. पण, आम्ही स्थापन केलेल्या चौकशी समितीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. केंद्रातील सुरक्षा प्रभारीकडे तपास सोपवण्यात आला होता. पण, सर्वोच्च न्यायालयाने तपास थांबवून योग्य केले, असेही चन्नी म्हणाले.

पंजाबमध्ये जीवाला धोका असल्याचं सांगणं हा राज्याचा अपमान’: सिद्धू

पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांनी चंदीगढमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी सिद्धू यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. पंजाबमध्ये जीविताला धोका असल्याचं सांगणं हा राज्याचा अपमान असल्याचं सिद्धू यांनी म्हटलंय.

सिंद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. रस्ते मार्गानं जाण्याचं नियोजन अचानक का करण्यात आलं? फिरोजपूरमध्ये होणाऱ्या रॅलीसाठी लोकांची गर्दी नव्हती. त्यामुळेच हे संपूर्ण नाटक रचण्यात आलं. ७० हजार खुर्च्या आणि फक्त ५०० लोक होते. पंजाबमध्ये भाजपला समर्थक नाहीत. पंजाबमध्ये भाजप पूर्णपणे उघडी पडली असल्याची घणाघाती टीका सिद्धू यांनी केलीय.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावरही निशाणा

पंजाबमध्ये लोकांनी भाजपला नाकारले आहे. भाजपनं घाणेरडं राजकारण आता बंद केलं पाहिजे. आयबी, सेंट्रल एजन्सी पंतप्रधानांच्या सुरक्षेतील चुकीला जबाबदार नाहीत का? असा सवाल त्यांनी केलाय. तसंच राजधानी दिल्लीमध्ये शेतकरी दीड वर्षे आंदोलन करत होते. तेव्हा शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला पण हिंसा झाली नाही’, असंही सिद्धू म्हणाले. यावेळी सिद्धू यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावरही निशाणा साधला. अमरिंदर सिंग हे भाजपचे पोपट आहेत आणि ते भाजपच्या पिंजऱ्यात कैद आहेत, अशा शब्दात सिद्धू यांनी अमरिंदर यांच्यावर टीका केलीय.

‘भाजपनं आता राजकारण करणं बंद केलं पाहिजे. येथे तुम्हाला उत्तर मिळेल. पंजाबमध्ये राष्ट्रपती शासनाचा मुद्दा उपस्थित करणारे तुमचे (भाजपचे) पोपट आहेत’, अशी टीका सिद्धू यांनी केलीय. पंतप्रधान महोदय तु्म्ही केवळ भाजपचे नाही तर सर्वांचे पंतप्रधान आहात. तुमच्या जीविताची किंमत देशातील प्रत्येक लहान मुलही जाणतं. पंजाबमध्ये जीविताला धोका असल्याचं तुम्ही म्हणालात. हा या राज्याचा पंजाबियतचा अपमान आहे, असंही सिद्धू म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button