पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ग्लॅमरचा बोलबाला
बंगाली अभिनेत्री श्राबंती चटर्जी यांचा भाजपामध्ये प्रवेश
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. तर अनेक नेतेमंडळी पक्षांतर करताना दिसत आहे. यातच आता बंगाली अभिनेत्री श्राबंती चटर्जी यांनी राजकारणात उडी घेतली आहे. त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री श्राबंती चटर्जींनी भाजपाप्रवेश केला. पश्चिम बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि पक्षाचे निवडणूक प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत अभिनेत्री श्राबंती चटर्जी यांचा पक्षप्रवेश झाला. त्यामुळे आता भाजपाकडून त्यांना विधानसभेचे तिकीट मिळणार की त्या स्टार प्रचारक म्हणून काम करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, यंदाही पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात कलाकारांची एन्ट्री होताना दिसून येत आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी आतापर्यंत राजकारणात प्रवेश केला आहे.
33 वर्षीय श्राबंती चटर्जी या बंगालमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. वयाच्या दहाव्या वर्षी मायार बंधनमधून त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर चॅम्पियन, भालोबासा भालोबासा, वाँटेड, फायटर, इडियट यासारख्या अनेक बंगाली चित्रपटात त्या झळकल्या आहेत. डान्स बांगला डान्स या रिअॅलिटी शोचं परीक्षणही त्यांनी केले आहे. 2003 मध्ये राजीव विस्वास यांच्यासोबत श्राबंती चटर्जी यांनी लग्न केले होते.
निवडणुकांमध्ये कलाकारांना तिकीट देण्याचा ट्रेंड पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पार्टीने केला होता. आतापर्यंत तृणमूल काँग्रेसमधून अनेक कलाकार राजकीय रिंगणात उतरले आहेत. भाजपाकडूनही आता कलाकारांना राजकाराणात येण्याची संधी दिली जात आहे. भाजपामध्ये पश्चिम बंगालमधील दहाहून अधिक कलाकारांनी आतापर्यंत प्रवेश केला आहे.