गुलाम नबी आझाद यांच्या पद्म पुरस्कारावरुन काँग्रेसमध्येच महाभारत
नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घोषित करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांवरून एकीकडे विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर टीका करत असताना, दुसरीकडे मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यावरून पक्षातच मतभेद असल्याचे उघडकीस आले आहे. पद्म पुरस्कारावरून काँग्रेसमध्येच महाभारत सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गुलाम नबी आझाद यांना पद्म पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करत, ‘ते आझाद राहू इच्छितात, गुलाम नाही’, असा टोला लगावला आहे.
विविध राज्यातील अनेक दिग्गजांना पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचाही समावेश आहे. यावरून काही काँग्रेस नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, काही नेत्यांनी यावरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. यानंतर गुलाम नबी आझाद यांनी ट्विटर प्रोफाइल बदलल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. मात्र, खुद्द गुलाम नबी आझाद यांनी यावर स्पष्टीकरण देत, संभ्रम निर्माण करण्यासाठी काही लोकांकडून चुकीचा प्रचार केला जात आहे. माझ्या ट्विटर प्रोफाइलमध्ये काहीही काढले किंवा जोडलेले नाही. ते पूर्वीप्रमाणेच आहे, असे म्हटले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी एका ट्विटर युझरच्या ट्विटला रिप्लाय देताना, योग्य गोष्टी कराव्यात. ते आझाद राहू इच्छितात, कुणाचे गुलाम नाही, असे ट्विट करत टोला लगावला आहे. या ट्विटर युझरने पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्म पुरस्कार नाकारल्याबाबत ट्विट केले होते. दुसरीकडे जी-२३ मधील प्रमुख नेते मानले जाणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी गुलाम नबी आझाद यांना पद्म पुरस्कार दिल्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. गुलाम नबी आझाद यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल खूप खूप अभिनंदन. विडंबना अशी आहे की, जेव्हा राष्ट्राने सार्वजनिक जीवनातील त्यांचे योगदान ओळखले तेव्हा कॉंग्रेसला त्यांच्या सेवांची आवश्यकता नाही, असे ट्विट कपिल सिब्बल यांनी केले आहे.
दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पद्म पुरस्कारावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप आणि मोदी सरकारवर टीका केली आहे. हल्ली उठसूट कोणालाही पद्म पुरस्कार दिले जातात. त्यामुळे पुरस्कार नाकारले जातात, हे चित्र बरोबर नाही. अनेकांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आले आहेत. जिवंतपणी तुम्ही त्यांची किंमत करत नाही. बालाजी तांबे यांना गेल्या सात वर्षांमध्ये पुरस्कार का देण्यात आला नाही? या व्यक्ती हयात असताना त्यांना पुरस्कार का देण्यात आले नाहीत. पण मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्याची प्रथा थांबायला हवी, असे संजय राऊत म्हणाले.