Top Newsराजकारण

फडणवीसांच्या आशीर्वादाने बनावट नोटांचे रॅकेट; राजकारणाचे गुन्हेगारीकरण… !

अंडरवर्ल्डचा रियाज भाटी पंतप्रधानांपर्यंत कसा पोहोचला? गुन्हेगारांना महामंडळाच्या अध्यक्षपदी बसवले; नवाब मालिकांचे गंभीर आरोप

मुंबई: देशभरात ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी करण्यात आली त्यानंतर महाराष्ट्रात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीवार्दाने बनावट नोटांचे रॅकेट सुरु होते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला. पंतप्रधान मोदी यांनी देशातील काळा पैसा आणि बनावट नोटांचा साठा नष्ट करण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर देशभरात विविध ठिकाणी बनावट नोटा सापडत होत्या. मात्र, महाराष्ट्रात संपूर्ण वर्षभर एकदाही बनावट नोटा सापडल्या नाहीत. कारण, या सगळ्या रॅकेटला देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद होता, असे नवाब मलिक यांनी म्हटले. फडणवीसांच्या काळात गुन्हेगारांना संरक्षण देण्यात आलं. राजकारणाचं गुन्हेगारीकरण करण्याचं काम फडणवीसांनी केलं, असे गंभीर आरोपही मलिक यांनी केले.

नवाब मलिक बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. तत्पूर्वी मलिक यांनी ट्विट केले. ‘उनकी नींद खो गई है, अब चैन खोने का वक़्त आ गया है, मिलते है आज सुबह १० बजे’, असे ट्विट करत नवाब मलिकांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीस यांचा गुन्हेगारी विश्वातील अनेक लोकांशी संबंध असल्याचा आरोप केला. मलिक म्हणाले की, ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर केली होती. नोटाबंदीमुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडेल. काळा पैसा, बनावट नोटा संपुष्टात येतील असा दावा करण्यात येत होता. नोटाबंदी झाल्यानंतर देशातील विविध भागात बनावट नोटा सापडल्या. मात्र महाराष्ट्रात ८ ऑक्टोबर २०१७ पर्यंत बनावट नोटांचे एकही प्रकरण समोर आली नव्हते. नोटाबंदीच्या जवळपास एका वर्षानंतर ८ ऑक्टोबर २०१७ रोजी मुंबईच्या बीकेसी परिसरात १४ कोटी ५६ लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा पकडण्यात आला होता. मात्र, त्यावेळी फडणवीस यांनी हे प्रकरण दाबले. त्यावेळी केवळ ८ लाख ८० हजार रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणातील लोकांना काही दिवसांतच जामीन मिळाले होते. तेव्हा हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे का सोपवण्यात आले नाही? या नोटा नक्की कुठून आल्या, याचा शोध का घेण्यात आला नाही, असे सवाल मलिक यांनी उपस्थित केले.

समीर दाऊद वानखेडेंना मदतीला घेऊन प्रकरण दडपले !

ते पुढे म्हणाले की, या प्रकरणामध्ये मुंबईतून एका व्यक्तीला अटक झाली. तर पुण्यातही एकाला अटक करण्यात आली. इम्रान आलम शेख असे यामध्ये अटक झालेल्या एका व्यक्तीचे नाव होते. याप्रकरणी नवी मुंबईतही अटकेची कारवाई झाली. पण १४ कोटी ५६ लाख किमतीच्या बनावट नोटांचे हे प्रकरण ८ लाख ८० हजार रुपयांच्या बानावट असल्याचे दाखवून तडजोड करण्यात आली. या प्रकरणाचा तपास समीर दाऊद वानखेडेंकडे होता, असं मलिक यांनी सांगितलं.

बोगस नोटा अर्थव्यवस्थेत आणण्याचं काम पाकिस्तान, आयएसआयकडून करण्यात येतं. त्याचा थेट संबंध देशाच्या सुरक्षेशी आहे. पण तरीही या प्रकरणाचा तपास एनआयएकडे गेला नाही. नोटा कुठून आल्या याचा तपास पुढे गेला नाही. कारण तत्कालीन सरकारचं संरक्षण या सगळ्याला होतं, असा आरोप मलिक यांनी केला.

रियाज भाटी पंतप्रधानांपर्यंत कसा पोहोचला?

रियाझ भाटी कोण आहे? २९ ऑक्टोबरला तो बनावट पासपोर्टमुळे सहार विमानतळावर पकडला गेला. दाऊद इब्राहिम गँगसोबत त्याचे संबंध असल्याच्या बातम्या आल्या. दोन पासपोर्टसोबत पकडला जाऊनही तो दोन दिवसांत सुटला. तो भाजपच्या तुमच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये का दिसत होता? तुमच्या डिनर टेबलवर का दिसत होता. पंतप्रधान आले असताना रियाझ भाटीने त्यांच्यासोबतही फोटो काढले. तुमच्या आशीर्वादाने हा सगळा खेळ चालत होता, असा गंभीर आरोप मलिकांनी केला. फडणवीसांचे रियाज भाटीशी संबंध काय? असा सवाल नवाब मलिक यांनी फडणवीस यांना केला. यावेळी त्यांनी गुन्हेगारी जगताशी फडणवीसांचे कसे संबंध आहेत याची पोलखोल केली.

वानखेडे आणि फडणवीस यांचे जुने संबंध

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रकरणाचा तपास भटकवण्याचा प्रयत्न करत आहेत. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि फडणवीस यांचे जुने संबंध आहेत. एक अधिकारी २००८ मध्ये नोकरीवर येतो आणि १४ वर्षांत मुंबईबाहेर जात नाही, यामागचं कारण काय..?, असा सवाल मलिक यांनी विचारला.

राजकारणाचं गुन्हेगारीकरण करण्याचं काम फडणवीसांनी केलं, असा अतिशय गंभीर आरोप करणाऱ्या मलिकांनी काही जणांची नावंही घेतली. ‘मुन्ना यादव नागपुरातील कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर हत्येसह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला बांधकाम कामगार बोर्डचं अध्यक्षपद देण्यात आलं. मुन्ना यादव तुमच्या गंगेत न्हाऊन पवित्र झाला होता का?, असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला.

हैदर आझमला मौलाना आझाद फायनान्स महामंडळाचे अध्यक्षपद कसकाय मिळाले हैदर आझम बांगलादेशी लोकांना मुंबईत वसवण्याचं काम करतो की नाही, त्याची दुसरी पत्नी बांगलादेशी आहे की नाही, असाही सवाल मलिक यांनी विचारला आहे. पोलीस तपास सुरू केला, बंगाल पोलिसांनी ते बनावट कागदपत्र ठरवले. त्यावेळी, मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करुन तुम्ही ते प्रकरण दाबलं की नाही, असे अनेक प्रश्न नवाब मलिक यांनी फडणवीस यांना विचारले आहेत. मलिक यांच्या या आरोपावर आता फडणवीस काय उत्तर देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वांद्रे, वरळी येथे २०० कोटींचा फ्लॅट कुणाचा?

तुमचीही काळी संपत्ती मी वेळ आल्यावर काढणार आहे. वांद्रे, वरळी इथं २०० कोटींचा फ्लॅट कुणाचा आहे. बीकेसीतील फ्लॅट कोणाला राहायला दिला आहे. बेनामी संपत्तीबाबत तपास करायचा असेल तर मी कागदपत्रे द्यायला तयार आहे याबाबत आगामी काळात सांगेन असा इशारा मलिकांनी अमृता फडणवीसांना दिला आहे.

मलिकांकडून बदनामी, त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार : मुन्ना यादव

मलिक माझी बदनामी करत आहेत, त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे मुन्ना यादव यांनी म्हटले आहे. मलिक यांनी आरोप केल्यानंतर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, मी देवेंद्रजींचा निकटवर्तीय, माझ्याविरोधात याआधीही खोट्या केसेस आणि चौकशा लावण्यात आल्या. माझ्यावर कोणतेही क्रिमिनल गुन्हे नाहीत. माझ्यावर राजकीय गुन्हे आहेत. मलिक माझी बदनामी करत आहेत. मी मलिकांविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार आहेत. त्यांची औकात १ रुपयाची आहे. काल म्हणाले, हायड्रोजन बॉम्ब टाकणार, आज हा बॉम्ब फुसका निघाला. मलिकांचेच अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. नवाब मलिक लवकरच जेलमध्ये जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button