आर्थिक पॅकेज द्या, अन्यथा लॉकडाऊन मोडून काढू : विरेन शाह

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या लॉकडाऊनच्या संभाव्य निर्णयाविरोधात मुंबईतील व्यापाऱ्यांनी पुन्हा एकदा बंडाचा झेंडा फडकावला आहे. राज्यातील दुकानं बंद राहणार असतील तर ऑनलाईन डिलिव्हरीही बंद ठेवा. ही सेवा सुरु राहिली तर आम्ही त्याला विरोध करु, असेही विरेन शाहा यांनी म्हटले. राज्यात लॉकडाऊन करायचा असेल तर सरकार दुकानदार आणि व्यापाऱ्यांना (Traders) काय पॅकेज देणार, याबाबत घोषणा करावी. अन्यथा आम्ही लॉकडाऊनला जुमानणार नाही, असा इशारा फेडरेशन ऑफ रिटेल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी दिला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी राज्यात कोरोनाला आवर घालायचा असेल तर लॉकडाऊन अपरिहार्य असल्याचे म्हटले होते. मात्र, भाजपने पूर्ण लॉकडाऊनला विरोध दर्शविला होता. लॉकडाऊन करायचा असेल राज्य सरकारने व्यापाऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. त्यासाठी सरकारच्या डोक्यावर कर्ज झाले तरी चालेल, अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती.