राजकारण

मुंबई पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्यासाठी आयुक्तांचे कठोर निर्णय!

CIU युनिटचे पंख छाटणार

मुंबई : मुंबईचे नवीन पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पदभार स्विकारल्यानंतरच मुंबई पोलिस दलामध्ये अनेक मोठे बदल होणार असल्याचे कळते. सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलिसांची झालेली बदनामी पाहता आता मुंबई पोलिस दलाकडून सीआययू युनिटचे पंख छाटण्याची तयारी मुंबई पोलिसांकडून सुरू झाल्याचे कळते. तसेच सीआययू युनिटकडे तपासासाठी असणारी मोठी प्रकरणेही काढून घेण्यात येणार असल्याचे समजते. मुंबई पोलिस दलाची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठीच हे बदल होणार असल्याचे कळते.

मुंबई पोलिस दलातील सर्वात महत्वाचे असे मानल्या जाणाऱ्या क्राईम इंटेलिजन्स युनिट म्हणजे (CIU) युनिट सध्या सचिन वाझे यांच्या प्रकरणामुळे चर्चेत आहे. सचिन वाझे या एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याकडे मुंबई पोलिसांच्या सर्वात महत्वाच्या अशा सीआययू युनिटची जबाबदारी देण्यात आली होती. सचिन वाझेंच्या या विभागातील नेमणुकीमुळे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सचिन वाझे यांच्या नेमणुकीनंतरच अनेक प्रकरणांचा तपास हा सचिन वाझेंकडे येऊ लागला. मुंबईतील अनेक सेलिब्रिटींच्या हायप्रोफाईल प्रकरणांपासून ते टीआरपी स्कॅम अशा अनेक मोठ्या प्रकरणांमध्ये सीआययू युनिटची महत्वाची जबाबदारी होती.

नगराळे यांनी मुंबई पोलिस आयुक्त पदाची जबाबदारी घेतल्यानंतर मुंबई पोलिस दलात मोठी खांदेपालट होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणजे सीआययू युनिटचे पंख छाटण्याचे प्रकार सुरू होतील असे अपेक्षित आहेत. सीआययू युनिटने गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मोठी प्रकरणे तपासासाठी घेतली होती. त्यामध्ये बॉलिवुड अभिनेता ऋतिक रोशन आणि रॅपर बादशहा यांच्यासारखी प्रकरणे होती. तसेच मुंबईतील अनेक महत्वाच्या गुन्ह्याचा तपासही सीआययूकडे आला असल्याचा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

सीआययू युनिटमध्ये आतापर्यंत वरिष्ठ पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती होत होती. पण सचिन वाझे यांच्या निमित्ताने मात्र या निकषांची पायमल्ली करत सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारी सीआययू युनिटच्या प्रमुखपदी नेमणुक करण्यात आली. त्यानंतर अनेक महत्वाच्या अशा हायप्रोफाईल प्रकरणांमध्ये सगळा तपास हा सीआययू युनिटकडेच येत होता. मनसुख हिरेन यांच्या स्कॉर्पिओ गाडी हरवल्याच्या तक्रारीचा तपासही सचिन वाझे यांनीच केल्याचे समोर आले आहे. तीन दिवस सचिन वाझेंकडून मनसुख हिरेन यांची चौकशी सुरू होती. तर सचिन वाझेच मनसुख हिरेन यांना आपल्या गाडीतून चौकशीसाठी पहिल्यांदा घेऊन आल्याचे व्हिडिओही समाजमाध्यमांवर आता व्हायरल झाले आहेत.

सचिन वाझे यांच्या नेमणुकीवर विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. २०१८ मध्ये सचिन वाझे यांच्या नेमणुकीसाठी युतीमध्ये माझ्यावर दबाव होता असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतल्या एका पत्रकार परिषदेत केला होता. तसेच सचिन वाझे यांना सेवेत घेण्यासाठी मला उद्धव ठाकरे यांनी फोन केला होता. तसेच युतीत असताना शिवसेनेचे काही मंत्रीदेखील सचिन वाझे यांना सेवेत घेण्यासाठी येऊन भेटले होते असा दावा फडणवीस यांनी केला होता. सचिन वाझे यांना पोलिस दलात घेण्यासाठी अॅडव्होकेट जनरल यांनीही नकार दिल्याचा उल्लेख फडणवीस यांनी केला होता. तर सचिन वाझे यांना सीआययू सारख्या महत्वाच्या ठिकाणी एपीआय दर्जाचा अधिकारी असूनही नेमले गेले यावरही फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

पुणे फॉरेन्सिक टीम मुंबईत दाखल

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसह सापडलेल्या स्कॉर्पिओच्या प्रकरणात नॅशनल इनवेस्टिगेशन एजन्सी (NIA) च्या टीमकडून तपास सुरू आहे. एनआयएच्या टीमकडून आता या संपुर्ण प्रकरणात पुण्याच्या फॉरेन्स टीमला बोलावण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा पुणे यांचे पथक दुपारी मुंबईतील एनआयएच्या कार्यालयात दाखल झाले. या पथकाकडून मुकेश अंबानी स्फोटके प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या इनोव्हा तसेच इतर वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. केंद्राच्या अखत्यारीतील पुण्याची फॉरेन्सिक टीम आज शुक्रवारी दुपारपासूनच या संपुर्ण प्रकरणात गाड्यांचा झालेला एंगल आणि त्याच्याशी संबंधित पुरावे शोधत आहे.

या संपूर्ण प्रकरणात वापरण्यात आलेल्या गाड्यांच्या हाताचे ठसे आणि इतर पुरावे मिळतात का हे याची तपासणी सुरू आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सीसीटीव्हीत दिसलेल्या इनोव्हाचाही तपास यामध्ये सुरू आहे. स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओसोबतच ही इनोव्हा घटनेच्या दिवशी फिरत असल्याचे आढळले आहे. ही इनोव्हा पोलीस आयुक्तालयातून वाझेंच्या अटकेनंतर एनआयएने ताब्यात घेतली होती. फॉरेन्सिक टीमकडून केल्या जात असलेल्या संपूर्ण तपासणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले जात आहे. इनोव्हानंतर फॉरेन्सिक टीम इतर गाड्यांची तपासणी करणार आहेत असे कळते. फॉरेन्सिक टीमकडून या संपुर्ण गाड्यांची सध्या तपासणी सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button