रुग्णसंख्या अशीच वाढत राहिल्यास काही शहरांत कडक लॉकडाऊन, दोन दिवसांत निर्णय : टोपे
पुणे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक अशा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढत आहे. अशावेळी रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत राहिली तर काही शहरात लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यावा लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली रुग्णवाढ कायम राहिली तर काही शहरांमध्ये लॉकडाऊन आणि अजून कठोर निर्बंध लादण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे चिंता वाढत आहे. मंगळवारी याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल. काही दिवस दिले जातील. लगेच उद्या लॉडकडाऊन जाहीर होणार नाही, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन टाळायचं असेल तर जनतेनं नियम पाळायला हवे, असं आवाहनही टोपे यांनी नागरिकांना केलंय. अजून 2-4 दिवस कोरोना रुग्ण वाढण्याचा अंदाज आहे. त्यानंतर हे प्रमाण कमी होईल, असा अंदाज असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.
मुंबई, पुणे नागपुरात कोरोना केसेस वाढत आहे. अशावेळी केंद्रानं दिलेल्या सर्व सूचनांचं पालन करुन सर्व गोष्टी केल्या जात आहेत. पुण्यात रोज 3 लाख टेस्टिंग केल्या जात आहेत. मेट्रो सिटीमध्ये बेड पुरेशे उपलब्ध आहेत. संख्या ज्या गतीनं वाढत आहे, त्या दृष्टीनं अजून तयारी करावी लागेल. जम्बो सेंटर पुन्हा एकदा सुरु करावे लागतील. जिथे डॉक्टर, नर्स यांच्या जागा रिक्त आहेत. त्या भरण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
ग्रामीण भागातही लसीकर अधिक वेगानं करण्याची गरज आहे. सध्या आरोग्य केंद्रात लसीकरण केलं जात आहे. पण गावागावातील आरोग्य उपकेंद्रातही लसीची सोय करण्याचा विचार असल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले. तसंच ज्या खासगी रुग्णालयांमध्ये 20 बेडची सुविधा आहे, अशा रुग्णालयांमध्येही लसीकरणाची परवानगी दिली जाणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत कुठलीही लपवाछपवी होत नाही. इतर राज्यात बहुदा आकडे लवपले जात असतील, अशी शंका टोपे यांनी व्यक्त केली आहे. कारण काही राज्यात निवडणूक होत आहे. मोठ्या सभा होत आहेत. पण तिथली रुग्णसंख्या कमी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेत मोठं राज्य आहे. महाराष्ट्रात साडे बारा कोटी लोक राहतात. त्यामुळे तुलना करायची झाल्यास रुग्णसंख्येत महाराष्ट्राच्या पुढेही काही राज्य असल्याचं टोपे म्हणाले.