Top Newsराजकारण

टिपू सुलतान प्रकरणावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपची पोलखोल

‘ते’ पत्र बनावट, भाजप आमदाराचा दावा

मुंबई : शहरातील मालाड येथे क्रिडांगणाला दिलेल्या टिपू सुलतान नावामुळे सध्या मोठा वाद रंगला आहे. भाजपाने टिपू सुलतान यांच्या नावाला विरोध केल्यानं महाविकास आघाडीचे नेते भाजपाविरुद्ध आक्रमक झाले. त्यातच भाजपानेही टिपू सुलतान यांच्या नावाला पाठिंबा दिल्याचं जुनं पत्र व्हायरल होत आहे. त्या पत्राविरोधात आता आमदार अमित साटम यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत महापौर किशोरी पेडणेकर, पालकमंत्री अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे.

अमित साटम यांनी पत्रात म्हटलंय की, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि मंत्री अस्लम शेख यांच्याकडून एक पत्र व्हायरल केले जात आहे. ज्यामध्ये २७ डिसेंबर २०१३ रोजी महापालिकेच्या सभेत एका रस्त्याला टिपू सुलतान मार्ग नाव देण्याच्या प्रस्तावाला मी अनुमोदन दिले होते. परंतु असा कुठलाही फॉर्मेट मुंबई महापालिकेचा नाही. व्हायरल झालेले पत्र हे नव्याने तयार करण्यात आले आहे असा आरोप त्यांनी केला.

त्याचसोबत अनुमोदकाच्या ठिकाणी खाडाखोड करुन माझे नाव अ. भा. साटम असं हाताने लिहिलेले दिसून येते. या पत्रावर खाली सही आणि मंजूर असे लिहिलंय. म्हणजेच सदर प्रस्तावावर खाडाखोड करुन माझं नाव लिहिलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेले पत्र पूर्णपणे खोटे व नव्याने तयार केलेले आहे. त्यामुळे याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, राज्याचे मंत्री अस्लम शेख आणि मुंबई महापालिकेचे चिटणीस यांच्याविरोधात ४२०, ४९९, ५०० च्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपा आमदार अमित साटम यांनी केली आहे.

मुंबईतील मालाड येथील क्रिडा संकुलाला टिपू सुलतान नाव देण्यावरुन भाजपानं आक्षेप घेतला आहे. तर मागे गोवंडी येथील रस्त्याला टिपू सुलतान नाव देण्याच्या प्रस्तावाला भाजपानेच अनुमोदन दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी भाजपानं आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर टिपू सुलतान नावावरून भाजपा धार्मिक रंग देऊन राज्यातील वातावरण बिघडवू पाहत आहे. पाकिस्तान, मंदिर, मशिद, धर्म संसदेच्या माध्यमातून धार्मिक मुद्दे चर्चेत आणून भाजपा राजकारण करत आहे. मुंबईत टिपू सुलतानच्या विषयावरून वातावरण पेटवून त्याचा निवडणुकीत फायदा उचलण्याचे हे षडयंत्र आहे. परंतु भाजपाने धार्मिक मुद्दे सोडून निवडणुका लढवून दाखवाव्या असं आव्हान काँग्रेसनं दिलं आहे.

भाजप नेत्यांच्या प्रबोधनासाठी राष्ट्रपतींचा व्हीडिओ

ज्या टिपू सुलतानवरून हे सर्व राजकारण पेटलं आहे, त्या टिपू सुलतानाबाबत देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा एक व्हिडिओ काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट केला आहे. भाजप नेत्यांच्या प्रबोधनासाठी त्यांनी हा व्हिडिओ पाहवं असा टिमटा सावंत यांनी काढला आहे.

या व्हिडिओत टिपू सुलतानाचा उल्लेख करताना राष्ट्रवती रामनाथ कोविंद म्हणातात, टिपू सुलतानाचा इंग्रजांशी लढताना वीर मृत्यू झाला. ते म्हैसूरच्या विकासातही अग्रगण्य होते, असा उल्लेख देशाच्या राष्ट्रपतींनी टिपू सुलतानाचा केला आहे. म्हैसूर प्रांतात टिपू सुलतानाचा मोठा दबदबा होता. सचिन सावंत यांनी राष्ट्रपतींचा हाच व्हिडिओ ट्विट करत भाजपला चिमटे काढले आहे, सचिन सावंत यांनी ट्विट करताना म्हटले आहे की, महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या प्रबोधनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शहीद टिपू सुलतान यांचा केलेला गौरवार्थ उल्लेख. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा नाही जरी केला तरी राष्ट्रपतींचा तरी भाजपा नेते आदर करतील अशी अपेक्षा आहे. असा टोला त्यांनी लगवाला आहे.

 

दंगल घडवून तरी दाखवा, मग बघा…; किशोरी पेडणेकरांचे भाजपला आव्हान

मालाडमधील मैदानाला टिपू सुलतान क्रिडांगण असं नाव देण्याचं ठरलंच नाही. पण त्यावरुन भाजप मुंबईला अस्थिर करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई शांत आहे. जर दंगल घडण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर मग मैदानात या असं आव्हान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी भाजपला दिलं आहे. तसेच या मैदानाला राणी लक्ष्मीबाईंचे नाव देण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

मालाडच्या मैदानाला टिपू सुलतान क्रिडांगण असं नाव देण्यात येत आहे असा आरोप करत बुधवारी भाजपने मुंबईत आंदोलन केलं होतं. आता त्यावर मुंबईच्या महापौरांनी भाजपला चांगलंच सुनावलं आहे. महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, “मुंबई स्थिर आहे, तिला अस्थिर करु नका. मैदानाला टिपू सुलतान असं नाव देण्याचं महापालिकेनं कधी ठरवलंच नाही. भाजपला या न झालेल्या गोष्टीवरुन मुंबई अस्थिर करायची आहे. कुणाला हवीय दंगल? दंगल घडवून तरी दाखवा, मग बघा…”

टिपू सुलतान यांचं नाव मुंबईतील मैदानाला या आधीही देण्यात आलं होतं. पण भाजप आता राजकारण करत असून मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत आहे असा आरोपही त्यांनी केला.

भाजपच्या ढोंगी अपप्रचाराला राष्ट्रवादीचे उत्तर, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर पलटवार केला आहे. संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्यासबोत टिपू सुलतानचा फोटो असल्याचे दाखव भाजपचा ढोंगीपणा उघड केला आहे. भाजप आता संविधानात जे आहे ते मान्य करणार का? असा सवालच जितेंद्र आव्हाड यांनी भाजपमधील नेत्यांना केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत भाजपला प्रति प्रश्न केला आहे. भाजप नेत्यांनी मालाडमध्ये क्रीडा संकुलाला टिपू सुलतानाचे नाव देण्यावरुन वाद निर्माण केला आहे. यावर जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत हल्लाबोल केला आहे. हे घ्या तुमच्या ढोंगी अपप्रचाराला आमचे खरे खरे उत्तर संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबतच टिपू सुलतान यांच्या पराक्रमाला स्थान देवून गौरविण्यात आलंय आता तुम्ही ठरवा जे संविधानात आहे ते तुम्हाला मान्य आहे की नाही ? असा सवालच जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलेल्या फोटोत राणी लक्ष्मीबाई आणि टिपू सुलतान यांचा फोटो आहे. हा फोटो संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये एकाच पानावर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button